Myntra Refund Scam: ऑनलाइन शॉपिंग कंपनी 'मिंत्रा'ची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; चोरट्यांनी घेतला रिफंड सिस्टमचा फायदा, जाणून घ्या सविस्तर
ऑडिट दरम्यान ही फसवणूक उघडकीस आली.
Myntra Refund Scam: ऑनलाइन शॉपिंग कंपनी मिंत्रा (Myntra) कोट्यावधींच्या फसवणुकीची बळी ठरली आहे. जयपूर येथील एका टोळीने कंपनीच्या रिफंड सिस्टमचा फायदा घेत कंपनीची मोठी फसवणूक केली आहे. मार्च ते जून दरम्यान, मिंत्राला एकट्या बेंगळुरूमध्ये 1.1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. देशभरात हे नुकसान 50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. फसवणूक करणाऱ्यांनी ब्रँडेड शूज, कपडे, पिशव्या, सौंदर्यप्रसाधने, घड्याळे, दागिने अशा महागड्या वस्तू मागवल्या. डिलिव्हरीनंतर माल कमी प्रमाणात मिळाला, चुकीच्या पद्धतीने मिळाला किंवा अजिबात मिळाला नाही अशा तक्रारी त्यांनी केल्या.
यानंतर त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मिंत्राच्या ॲपवरच तक्रार नोंदवण्याच्या सुविधेचा फायदा घेत घोटाळेबाजांनी कंपनीची फसवणूक केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, याबाबत मिंत्राने बेंगळुरू पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अंदाजे 5,529 बनावट ऑर्डरद्वारे कंपनीचे नुकसान झाले. या ऑर्डर्स बेंगळुरूमधील वेगवेगळ्या पत्त्यांवर वितरित करण्यात आल्या होत्या. तसेच याचा परतावा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे देशभरात सुमारे 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु, बेंगळुरू पोलिसांनी मिंत्राला फक्त शहरात केलेल्या डिलिव्हरीशी संबंधित प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. फसवणूक करणारे मिंत्राच्या ॲप किंवा पोर्टलद्वारे मोठ्या प्रमाणात ऑर्डर देत असत. पेमेंट ऑनलाइन किंवा कॅश-ऑन-डिलिव्हरीद्वारे केले जात असे. पार्सल मिळाल्यावर ते त्याबाबत मिंत्राच्या ॲपवरच तक्रार नोंदवत होते. कधी कमी माल मिळाला, तर कधी बनावट किंवा चुकीचा माल मिळाल्याच्या तक्रारी होत्या. अनेकवेळा ऑर्डर मिळाली नसल्याचा दावाही करण्यात आला. त्यानंतर रिफंडसाठी दावा करण्यात येत होता. (हेही वाचा: Digital Arrest Scam: तोतया CBI अधिकाऱ्यांकडून महिलेची तब्बल 5.5 कोटी रुपयांची फसवणूक; डिजिटल अटक घोटाळ्याची बळी)
मिंत्रा डिझाईन्सचे अंमलबजावणी अधिकारी सरदार एमएस यांनी पोलिसांना सांगितले की, बेंगळुरूमधील विविध पत्त्यांवर वितरित केलेल्या सुमारे 5,529 बनावट ऑर्डरमुळे कंपनीचे नुकसान झाले आहे. ऑडिट दरम्यान ही फसवणूक उघडकीस आली. फसवणूक करणाऱ्यांनी परतावा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केला होता. या फसवणुकीमागे राजस्थानच्या जयपूर येथील टोळीचा हात असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बहुतांश बनावट ऑर्डर जयपूरमधूनच देण्यात आल्या होत्या. वितरण पत्ता बेंगळुरू आणि इतर मोठ्या शहरांमध्ये देण्यात आला होता. अनेकदा हे पत्ते दुकाने, चहाची दुकाने आणि किराणा दुकाने अशी व्यावसायिक ठिकाणे होती.