Maharashtra Cyber Department Advisory: व्हायरल होत असलेला 'मोफत कोरोना चाचणी'चा मेसेज खोटा; सायबर हल्ल्यासाठी चीनने विणले जाळे; महाराष्ट्र सायबर विभागाने जारी केले मार्गदर्शक तत्वे
हा हल्ला मुख्यत्वे इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे भारत कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत असताना, दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचा (China) भारतावर सायबर हल्ला (Cyber Attack) होण्याची शक्यता आहे. हा हल्ला मुख्यत्वे इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याची योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘ncov2019.gov.in’ हा इमेल आयडी यासाठी वापरण्यात येत आहे व मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद याठिकाणचे लोक यासाठी बळी पडू शकतात. आता महाराष्ट्र सायबर विभागाने (Maharashtra Cyber Department) नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही सुचना जारी केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मिडीयावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद येथील नागरिकांची मोफत कोरोना चाचणी होणार असून, त्यासाठी नागरिकांना एक फॉर्म भरणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मात्र सायबर विभागाने हा मेसेज खोटा असल्याचे सांगत, स्वतःच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. (हेही वाचा: Cyber Attack: या 'Email Id' पासून सावधान! चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत)
पहा एएनआय ट्वीट -
यामध्ये म्हटले आहे-
- अनपेक्षित ईमेल, एसएमएस किंवा इतर संदेशांवर क्लिक करू नका.
- ओळखीच्या व्यक्तीने काही पाठवले असले तरी, ते उघडताना काळजी घ्या.
- ईमेल पत्ते, ई-मेलमधील स्पेलिंगच्या चुका, वेबसाइट आणि कोणी अपरिचिताने ई-मेल पाठवल्यास त्यापासून सावध रहा
- अपरिचित किंवा अज्ञात वेबसाइट्स/लिंकवर वैयक्तिक अथवा आर्थिक तपशील देऊ नका.
- कोरोना विषाणू चाचणी, अचानक लागलेले बक्षीस, खास ऑफर देणारे इमेल, कॅशबॅक ऑफर अशा मेसेजेसपासून सावध रहा.
- लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रदान करण्यापूर्वी किंवा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी URL चेक करा.
- सेफ ब्राउझिंग टूल्स, फिल्टरिंग टूल्स (अँटीव्हायरस आणि कंटेंट आधारित फिल्टरिंग टायटरींग) चा वापर करा.
- जर का तुम्हाला फिशिंग ईमल/मेसेज/कॉल आला, तो आमच्या अँटी फिशिंग पोर्टल www.reportphishing.in वर पाठवा.
अशा प्रकारे सायबर विभागाने नागरिकांना काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये मोठा सायबर हल्ला झाल्याचे वृत्त आले होते. या हल्ल्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. या सायबर हल्ल्यात अनेक लोकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेला आहे. या हल्ल्याचा तपास ऑस्ट्रेलिअन संघटना करीत आहेत, मात्र यामागे चीनचा हात असल्याची शक्यता वर्वली जात आहे.