भारतात Elon Musk च्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी; SpaceX मध्ये सुरु झाली नोकरभरती, जाणून घ्या कामाचे स्वरूप व पात्रता

भारतात, नियामकाकडून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्टारलिंकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची प्री-बुकिंग $99, म्हणजे सुमारे 7,200 रुपयांपासून सुरू झाली आहे

Elon Musk (Photo Credits: Getty Images)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक इलॉन मस्कची (Elon Musk) कंपनी SpaceX आपले सॅटेलाइट इंटरनेट 'स्टारलिंक' (Starlink) भारतात लॉन्च करणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी भारतात आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा कमी किमतीत इंटरनेट सेवा पुरवणार आहे. स्टारलिंकने भारतात आपल्या इंटरनेट सेवेसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. आता माहिती मिळत आहे की, SpaceX भारतात नोकऱ्या देत आहे. कंपनीचे कंट्री हेड इंडिया संजय भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने लिंक्डइनवर याबाबत खुलासा केला आहे.

भारद्वाज यांनी लिहिले की, ‘उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्याचा उपक्रम ग्रामीण भारतातून सुरू होणाऱ्या परिवर्तनाला गती देण्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल आहे. जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसे नोकरीच्या संधी खुल्या होतील. कंपनीला परवाना मिळाल्यावर कामाला गती येईल. पात्र उमेदवार त्यांचा बायोडाटा पाठवू शकतात.’

स्टारलिंकमध्ये नोकरभरती -

पदाचे नाव- कार्यकारी सहाय्यक, भारत

जबाबदारी- एक किंवा अधिक सी-लेव्हल अधिकाऱ्यांसाठी मीटिंगचे को-ऑर्डीनेशन करणे, कॅलेंडर व्यवस्थापन, भेटीच्या-मिटिंगच्या वेळा ठरवणे, प्रवासाचे वेळापत्रक सांभाळणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे, अजेंडा तयार करणे, सर्व कायदेशीर कागदपत्रे तसेच मेल आणि ग्राहक पत्रव्यवहार वेळेवर पूर्ण करणे, मीटिंग आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये SpaceX चे प्रतिनिधित्व करणे.

पात्रता- पदवी असणे आवश्यक, कार्यकारी स्तरावर 3 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस अॅप्लिकेशन्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टूल्सचा अनुभव असणे आवश्यक, भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे आणि सध्याचे स्थान देखील भारताचेच असावे.

कौशल्ये आणि अनुभव- एका हाय-स्पीड स्टार्ट-अप वातावरणात उच्च-स्तरीय कार्यकारी अनुभव असावा, कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान असावे. प्रोजेक्ट स्कोप डेव्हलपमेंटचा अनुभव असणे आवश्यक आहे. संभाषण कौशल्य उत्तम असावे. (हेही वाचा: WCL Recruitment 2021: वेस्टर्न कोल्डफिल्ड्स लिमिडेटमध्ये नोकर भरतीची संधी, जाणून घ्या अधिक)

दरम्यान, एलोन मस्क यांची कंपनी स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट पुढील वर्षी भारतात उपलब्ध होणार आहे. भारतात, नियामकाकडून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्टारलिंकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची प्री-बुकिंग $99, म्हणजे सुमारे 7,200 रुपयांपासून सुरू झाली आहे. ही रक्कम पूर्णपणे रिफंड होणार आहे.