Disney Layoffs: डिस्ने करणार 4 हजार कर्मचाऱ्यांची कपात; कंपनीने व्यवस्थापकांना दिल्या सूचना
यामुळे कंपनीची सुमारे सात अब्ज डॉलर्सची बचत होणार आहे.
Disney Layoffs: मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज डिस्ने (Disney) 4 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनी एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. मात्र, ही कपात छोट्या गटात होणार की, एकाच वेळी चार हजार नोकर्या जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डिस्नेची वार्षिक सभा 3 एप्रिल रोजी होणार आहे. या बैठकीत कपातीची घोषणा होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
पुनर्रचनेचा एक भाग म्हणून डिस्ने आपल्या बजेटमध्ये कपात करत आहे. त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने कर्मचार्यांना काढून टाकले जात आहे. एंटरटेनमेंट कंपनी आपली स्ट्रीमिंग सेवा Hulu मध्येदेखील कर्मचारी कपात करण्याचा विचार करत आहे. (हेही वाचा - Wipro Layoffs: आयटी कंपनी विप्रो फर्ममधून 120 कर्मचाऱ्यांना नारळ)
याशिवाय, कंपनी आपल्या स्ट्रीमिंग सेवा व्यवसायात देखील कपात करू शकते. यापूर्वी, कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी फेब्रुवारीमध्ये डिस्ने सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. यामुळे कंपनीची सुमारे सात अब्ज डॉलर्सची बचत होणार आहे. कंटेंट कमी करण्यासोबतच कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा विचार करत आहे.