Cyber Attacks on ICMR Website: आयसीएमआर वेबसाइटवर सायबर हल्ले; 24 तासांत 6000 वेळा हॅक करण्याचा प्रयत्न

सायबर हल्ल्यानंतर हल्लेखोरांना ब्लॉक करण्यात आल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. म्हणूनच सतत प्रयत्न करूनही ते त्यांच्या योजनेत यशस्वी होऊ शकले नाहीत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (ICMR) च्या वेबसाइटवर सायबर हल्ला (Cyber Attacks) झाल्याची बातमी आहे. हॅकर्सनी एकाच दिवसात सुमारे सहा हजार वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. 30 नोव्हेंबर रोजी सायबर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशात सातत्याने सायबर हल्ल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अलीकडेच दिल्ली एम्सच्या सर्व्हरवरही सायबर हल्ला झाला होता. सर्व्हर डाउन टाइममुळे अनेक दिवस सर्व कामे मॅन्युअली होत होती.

अहवालानुसार, आयसीएमआर वेबसाइटवर हाँगकाँग स्थित ब्लॅकलिस्टेड IP पत्त्याद्वारे हल्ला करण्यात आला. आयसीएमआरच्या सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये कोणतीही सुरक्षा त्रुटी नव्हती, ज्यामुळे हॅकर्स रुग्णाच्या माहितीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. एअनआयने दिलेल्या माहितीनुसार, आयसीएमआरची वेबसाईट सुरक्षित आहे. एनआयसीला मेलद्वारे सायबर हल्ल्याची माहिती देण्यात आली होत आणि त्यांच्याकडून रिपोर्ट आला आहे की, हा हल्ला रोखण्यात यश आले आहे.

आता वेबसाइटची सुरक्षा ही एनआयसी डेटा सेंटरची जबाबदारी आहे. सायबर हल्ल्यानंतर हल्लेखोरांना ब्लॉक करण्यात आल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. म्हणूनच सतत प्रयत्न करूनही ते त्यांच्या योजनेत यशस्वी होऊ शकले नाहीत. घटनेनंतर, ICMR कडून आलेल्या टीमला देखील अलर्ट करण्यात आले. दरम्यान, 23 नोव्हेंबर बुधवारी सकाळी दिल्ली एम्सचा मुख्य सर्व्हर डाउन झाला होता. बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत सर्व्हर डाउन होता, त्यानंतर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), दिल्ली पोलीस आणि गृह मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी तपास सुरु केला. (हेही वाचा: UPI Transactions: देशातील अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात युपीआय व्यवहारांमध्ये तब्बल 650 टक्के वाढ- Reports)

हाँगकाँगच्या दोन ई-मेल आयडीवरून एम्सच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही ई-मेलचे आयपी पत्ते शोधण्यात आले आहेत व यामध्ये चीनची भूमिका समोर येत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या इंटेलिजेंस फ्यूजन स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) च्या तपासात ही बाब समोर आली आहे.