Bajrang Punia Suspended By NADA: नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित; ऑलिम्पिक चाचण्यांदरम्यान डोपिंगचे नमुने न दिल्याने करण्यात आली कारवाई
NADA च्या म्हणण्यानुसार, बजरंगने 10 मार्च रोजी सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणी दरम्यान डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Bajrang Punia Suspended By NADA: भारतीय पुरुष कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) तात्पुरते निलंबित केले आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील बजरंगच्या सहभागाला मोठा धक्का बसला आहे. NADA च्या म्हणण्यानुसार, बजरंगने 10 मार्च रोजी सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणी दरम्यान डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजरंगचे निलंबन वेळीच उठवले गेले नाही तर तो पुढील महिन्यात होणाऱ्या निवड चाचणीसह कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. सोनीपत येथे झालेल्या चाचणीदरम्यान बजरंगने लघवीचा नमुना देण्यास नकार दिला होता, त्यानंतर नाडाने त्याला नमुना देण्यास सांगितले होते. NADA ने याबाबत जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेला (WADA) माहिती दिली. त्यानंतर WADA ने NADA ला बजरंगला नोटीस पाठवून चाचणीला नकार का दिला? याचे उत्तर मागितले. (वाचा - Paris Olympics: बजरंग पुनिया आणि रवि दहियाचे ऑलम्पिकचं स्वप्न भंगलं, ट्रायल्समध्ये पराभव)
NADA ने 23 एप्रिल रोजी बजरंगला नोटीस बजावली आणि 7 मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत बजरंगला पराभवाचा सामना करावा लागला होता. काही महिन्यांपूर्वी बजरंगने डोप कलेक्शन किट कालबाह्य झाल्याचा आरोप करत एक व्हिडिओ जारी केला होता. NADA ने एका निवेदनात म्हटले आहे की, बजरंगला या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अंतिम निर्णयापर्यंत कोणत्याही स्पर्धा किंवा चाचणीमध्ये भाग घेण्यापासून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन पत्र वर्ल्ड युनायटेड रेसलिंग (UWW) शी संलग्न असलेल्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) बरखास्त केलेल्या तदर्थ समितीला पाठवण्यात आले होते.