खाशाबा जाधव: हुकणाऱ्या सामन्यात दाखवला डाव; ऑलिम्पिकमध्ये पदकावर कोरले नाव
ज्यामुळे हुकणाऱ्या सामन्यात जाधवांनी काळालाही केले चितपट. मिळवले पदक.
भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. देशात सुरू असलेला स्वातंत्र्याचा जल्लोश अद्यापही कायम होता. त्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने काही कामगिरी केली की, लगेच त्याची नोंद घेतली जायची. त्या काळात मीडिया तितका प्रभावी नव्हताच. पण, वर्तमानपत्रांतून छापून येणाऱ्या बातम्या लोक वाचायचे आणि त्याची चर्चाही व्हायची. अशा उत्सुकतेच्या काळात एक बातमी धडकली. १९५२चे ते वर्ष. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सूवर्ण पदक जिंकले. ही घटना त्या काळात प्रचंड मोठी होती. त्यामुळे त्याची चर्चा होणे स्वाभाविक होते. पण, असे असले तरी महाराष्ट्रासह देशभरात चर्चा झाली ती, एका पैलवानाची. त्याने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कास्य पदकाची. पैलवानाचे नाव होते खाशाबा जाधव. भारतीय कुस्तीचे नाव जगात पोहोचवणारा आणि कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा पहिला कुस्तीपटू. खाशाबा जाधव. आजवर खाशाबा जाधवांवर बरेच लिहिले आहे. पण, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो थरार... ज्यामुळे हुकणाऱ्या सामन्यात जाधवांनी काळालाही केले चितपट. मिळवले पदक.
'खाशाबा, तूपण आमच्यासंघ फिरायला चल'
...त्याचं झालं असं, १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा गट युरोपला पोहोचला. स्पर्धा पार पडली. पदकांच्या स्वरूपात भारताच्या हाती म्हणावं तसं फारसं काही लागलं नव्हतं. त्यात आता स्पर्धाही संपत आली होती. अगदी शेवटचे २-३ दिवस बाकी होती. भारताच्या इतर खेळाडूंच स्पर्धेतलं आव्हानही जवळपास संपल्यातच जमा होतं. कुस्तीकडूनच काही आपेक्षा होत्या. त्यामुळे व्यवस्थापकासह इतर खेळाडूही काहीसे सैलावलेच होते. त्यात संघासोबत व्यवस्थापक म्हणून असलेल्या दिवान प्रताप चंद यांना स्पर्धा असलेलं (हेलसिंकी) शहर पहायचं होतं. खरंतर त्यांना हे शहर पाहण्याची काहीशी घाईच झाली होती. त्यामुळे त्यांनी इतर खेळाडूंनाही सोबत घेण्याचा विचार केला. शहर फिरण्याच्या नादात त्यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधवांनाही आग्रह केला. जाधवांना इंग्रजी फारसं कळत नव्हतं. दरम्यान, शहर पाहण्याच्या नादात प्रताप चंद यांना खाशाबा जाधवांच्या सामन्याचा दिवसच ध्यानात आला नाही. उलट त्यांनी 'तुझी मॅच उद्या आहे. तेव्हा आज तू आमच्याबरोबर फिरायला चल', अशी गळ घातली. पण, खाशाबांना कदाचीत अंतर्मनानंच साद घातली असावी...
खाशाबा जाधव हाजीर हो....
...प्रताप चंद यांचा प्रस्ताव खाशाबा जाधवांनी नम्रपणे नाकारला. ते म्हणाले 'तुम्ही या हिंडून मी जरा बाकीच्या पैलवानांचे सामने बघतो'. खाशाबांचे म्हणने ऐकून बाकीची मंडळी फिरायला गेली. मग खाशाबाही स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी निघाले. पण, सोबत असलेल्या किटचं काय करायचं? हा प्रश्न त्यांना पडला. मग, 'चला असूंद्या सोबत काय व्हतंय त्याला', असं मनाशीच म्हणत खाशाबांनी किट पाठीवर टाकलं आणि ते स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले. स्पर्धा सुरू झाल्या. देशोदेशींच्या मल्लांकडून मॅटवर टाकले जाणारे डाव, आव्हान-प्रतिआव्हान खाशाबा बसल्या जागेवरून पाहात होते. दरम्यान, एक विचित्रच प्रकार घडला. ध्वनिक्षेपकातून अस्सल इंग्रजी उच्चारात खाशाबा जाधवांच नाव पुकारला गेलं. ते इंग्रजी उच्चार जाधवांना फारसे समजलेच नाहीत. पण, जाधव हे शब्द त्यांच्या कानावर बरोबर आले. त्यांनी तर्क लावला आपलंच नाव पुकारलंय. त्यांनी तिथं जाऊन जाधवांनी चौकशी केली तर, पुढचाच सामना आपला असल्याचे जाधवांना कळलं.
...तयारी हाय पर, कल्पनाच न्हाय! आता करायचं काय?
...एक तर पूर्वतयारी आहे पण, पूर्वकल्पना काहीच नाही. त्यात सोबत म्हणून संघातलं कुणीच नाही. आता काय करायचं? नशीब किट तर सबत होतं. मुळातच लढवय्या असलेल्या आणि कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या रांगड्या तालमीत तयार झालेला हा पठ्ठ्या मैदानात उतरण्यासाठी तयार झाला. खाशाबा जाथव कुस्तीसाठी मॅटवर आले. पण, घडले असे की, त्यांचा प्रतिस्पर्धी मैदानातच आला नाही. त्यामुळं जाधवांना बाय मिळाला. जाधवांसाठी ही बाब महत्त्वाची ठरली. त्यानंतर आव्हान द्यायला मैदानात आलेल्या कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांना जाधवांनी डाव दाखवत धूळ चारली. जाधवांनी क्वार्टर फायनल गाठली.
रौप्य हुकले, कास्य मिळाले..
दरम्यान, क्वार्टर फायनलमध्ये जाधवांची लढत रशियाच्या मेमेदबेयोव्हसोबत होती. रशियाचा खेळाडू जाधवांच्या तुलनेत तगडा होता. जाधवांनाही त्याची कल्पना होती. पण, त्यांनी लढत केली. अखेर व्हायचे तेच झाले. रशियाच्या खेळाडूकडून जाधवांना ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे जाधवांचे रौप्य पदक हुकले पण, त्यांनी कास्य पदक मिळवले. खाशाबा जाधवांनी जर अंतर्मनाची साद ऐकली नसती. आणि ते इतरांसबत शहर फिरायला गेले असते तर, जाधवांचा सामना हुकला असता. त्यामुळे केवळ जाधवच नव्हे तर, देशही कास्य पदकाला मुकला असता.
ता. क. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव' नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात खाशाबा जाधवांच्या पदकाची एक वेगळी कहाणी सांण्यात आली आहे. ज्यात रशियाच्या खेळाडूसोबत कुस्ती खेळताना पंचांनी दिलेले जाधव यांच्या विरुद्धचे निर्णय. स्पर्धेचा नियम न कळल्याने (डावलले गेल्याने) विश्रांती न घेता जाधवांना खेळावा लागलेा सामना. आदी गोष्टींबाबत भाष्य केले आहे. जज्ञासूंनी आणि कुस्तीप्रेमींनी हे पुस्तक वाचायला हवे.