IPL 2019 Final: हरभजन सिंह चा खुलासा; पायातून रक्तस्राव होत असतानाही Shane Watson ने चालू ठेवली आपली फलंदाजी

आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात शेन वॉटसनने (Shane Watson) डाव्या पायातून रक्तस्त्राव होत असतानाही, मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजी करणे चालूच ठेवले होते

Shane Watson (Photo Credit : Youtube)

मोठ्या धामधुमीत आयपीएल 12 (IPL 12) चे पर्व पार पडले. अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघावर मात करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. जल्लोष झाला, मिरवणुका निघाल्या, सेलिब्रेशन झाले मात्र चेन्नई सुपरकिंग्जची खेळी चाहते विसरू शकले नाहीत. अशात काल चेन्नई सुपरकिंग्जचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने एक खुलासा केला. आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात शेन वॉटसनने (Shane Watson) डाव्या पायातून रक्तस्त्राव होत असतानाही, मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजी करणे चालूच ठेवले होते.

खेळी दरम्यान वॉटसनने रन घेत असताना आपली विकेट वाचवण्यासाठी डाईव्ह मारला, त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. रक्तस्त्राव होत असतानाही, वेदना होत असतानाही वॉटसनने आपली खेळी तशीच सुरु ठेवली. हरभजन सिंहने आपल्या इंस्‍टाग्राम स्टोरीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. सामन्यानंतर वॉटसनच्या पायाला सहा टाके घालण्यात आले आहेत.

हरभजनने वॉटसनचा एक फोटो पोस्ट केला आहे. आपल्या स्टोरीमध्ये हरभजन लिहितो, ‘आपल्याला त्याच्या गुडघावर रक्त दिसत आहे... सामन्यानंतर त्याच्या पायाला 6 टाके घालण्यात आले. डायविंग करताना त्याला दुखापत झाली, पण कोणाला काहीही न बोलता त्याने आपली खेळी तशीच चालू ठेवली.’ (हेही वाचा: जसप्रीत बुमराह ठरला 'मॅन ऑफ द मॅच'; तर पोलार्ड Perfect Catch of the Season चा मानकरी)

दरम्यान, शेन वॉटसनने रविवारी फाइनलमध्ये शानदार फलंदाजी करत, चेन्नई सुपरकिंग्जला विजयाच्या अगदी जवळ पोहचवले होते. डाव्या हाताच्या फलंदाजीने त्याने 59 चेंडूंत 80 धावा केल्या. शेवटी तो रन आउट झाला आणि चेन्नई संघ 1 धावेने पराभूत झाला. मात्र आता सर्वत्र वॉटसनच्या दुखऱ्या पायाची चर्चा चालू आहे.