ZIM vs PAK Test 2021: पाकिस्तानचा हसन अली आणि झिम्बब्वेचा Luke Jongwe यांच्या क्रिकेटच्या मैदानावर बाचाबाची; पाहा नाट्यमय व्हिडिओ
जोंगवेच्या बॅटिंगने पाकिस्तानी गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने अस्वस्थ झाला होता आणि जोंगवेकडे पहात काहीतरी बडबडताना दिसला.
ZIM vs PAK Test 2021: पाकिस्तान (Pakistan) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपुष्टात आली. पाकिस्तानने यजमान झिम्बाब्वेवर 2-0 क्लीन स्वीप स्वीप केला. या दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हरारे येथे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) आणि ल्यूक जोंगवे (Luke Jongwe) यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली. पाकिस्तानसाठी विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक असताना झिम्बाब्वेच्या जोंगवे या फलंदाजाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. जोंगवे एकाकी लढा देत राहिला आणि 37 धावा करून माघारी परतला. जोंगवेच्या बॅटिंगने पाकिस्तानी गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने अस्वस्थ झाला होता आणि जोंगवेकडे पहात काहीतरी बडबडताना दिसला.
हसन आणि जोंगवे यांच्यातील मैदानावरील बाचाबाचीच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झिम्बाब्वे संघाने फॉलोऑन खेळत दुसर्या डावात 9 विकेट्स गमावून 290 धावा केल्या होत्या आणि चौथ्या दिवशी पाकिस्तानी संघाला फक्त एका विकेटची गरज होती. पण झिम्बाब्वेच्या ल्यूक जोंगवेने पाकिस्तानला विजयासाठी प्रतीक्षा करावी लावली. दिवसाखेर जोंगवे क्रीझवर 31 धावा करून खेळत होता. सर्वांना वाटले की आता प्रकरण मिटलं आहे पण संपूर्ण ओव्हर दोन्ही खेळाडूंमध्ये हा ड्रामा पाहायला मिळाला. हसन अली आणि ल्यूक जोंगवे जोंगवे यांच्यातील बाचाबाची पाहून मैदानावरील अंपायर व पाकिस्तानी विकेटकीपर मोहम्मद रिझवानला मध्यस्थी करण्यासाठी पुढे यावे लागले.
सामन्याबद्दल बोलायचे तर हरारे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने पहिले फलंदाजी करून 510 धावांचा डोंगर उभारला. अबिद अलीने पहिले द्विशतक ठोकत 215 धावांची नाबाद खेळी केली तर अझर अलीने नाबाद 126 दवाचे योगदान दिले. त्यानंतर झिम्बाब्वे संघ पहिल्या डावात 132 आणि दुसऱ्या डावात 231 धावाच करू शकला. पाकिस्तानसाठी दुसऱ्या डावात शाहीन शाह आफ्रिदी व नौमन अलीने प्रत्येकी 5 विकेट्स काढल्या व संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. अशाप्रकारे पाकिस्तानी संघाने 2-0 असा झिम्बाब्वेचा धुव्वा उडवला.