Yuvraj Singh Praises Stuart Broad: '500 विकेट घेणं विनोद नाही!' युवराज सिंहने केलं स्टुअर्ट ब्रॉडचं कौतुक; 'त्या' सहा षटकारांचा उल्लेख न करण्याची विनंती

2007 मध्ये ब्रॉडला टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात सलग सहा षटकार ठोकणाऱ्या युवराज सिंहने दिग्गज वेगवान गोलंदाजाचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांनाही खास आवाहन केले.

युवराज सिंह आणि स्टुअर्ट ब्रॉड (Photo Credit: Getty)

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला (Stuart Broad) वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडकडून कसोटी संघातून आश्चर्यचकितरित्या वगळण्यात आले. दुसर्‍या कसोटीत त्याचा समावेश झाल्यापासून त्याच्या सर्व टीकाकारांची बोलती बंद केली. जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवशी ब्रॉड गोलंदाजांच्या एलिट यादीमध्ये दाखल झाला आणि पाचव्या दिवशी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्वरूपात 500 विकेट घेणारा सातवा आंतरराष्ट्रीय गोलंदाज बनला. 2007 मध्ये ब्रॉडला टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात सलग सहा षटकार ठोकणाऱ्या युवराज सिंहने (Yuvraj Singh) दिग्गज वेगवान गोलंदाजाचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांनाही खास आवाहन केले. ब्रॉडला कामगिरीसाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात असताना, युवराजने ब्रॉडच्या दुर्मीळ कर्तृत्वाचे कौतुक केले. (ENG vs WI 3rd Test: वेस्ट इंडिजविरुद्ध निर्णायक सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या विक्रमी कामगिरीने जुळला अनोखा योगायोग, इंग्लंडने नोंदवला दणदणीत विजय)

“मला खात्री आहे की मी प्रत्येक वेळी स्टुअर्ट ब्रॉड बद्दल काहीतरी लिहितो, लोक त्याच 6 षटकाराशी संबंध जोडतात! आज मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की त्याने जे काही केले ते कौतुक करावे! 500 टेस्ट विकेट्स हा विनोद नाही - त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. ब्रॉड तू एक लिजेंड आहे! हॅट्स ऑफ,” युवराजने ट्विट केले. 2007 वर्ल्ड टी-20 मध्ये ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 षटकार लगावत युवराजने भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक अतिशय विलक्षण क्षण दिला. इंग्लंडचा अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफने युवराजला चिथावणी दिली आणि त्याचा फटका ब्रॉडला सहन करावा लागला.

विंडीजविरुद्ध निर्णायक कसोटी सामन्यात इंग्लंडने जबरदस्त कामगिरी करत विजय संपादन केला आहे आणि 2-1 ने इंग्लंडने मालिका जिंकली. ब्रॉडने अखेरच्या सामन्यात एकूण 10 विकेट आणि अर्धशतक झळकावत अष्टपैलू कामगिरी बजावली. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॉडने 500 बळींचा टप्पाही पूर्ण केला. विंडीजविरुद्ध या कामगिरीचा ब्रॉडला फायदा मिळाला आणि त्याचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं स्थान सुधारलं आहे. ब्रॉडने दहाव्या स्थानावरुन झेप घेत सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांच्या यादीत तिसरं स्थान पटकावलं आहे.