Yashasvi Jaiswal Milestone: वयाच्या 22 व्या वर्षी यशस्वी जैस्वालने रचला इतिहास, सचिन-विराटच्या क्लबमध्ये मिळवले स्थान
सध्या जयस्वालचे वय 22 वर्षे 332 दिवस आहे, तर महान सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी शतक झळकावले होते.
IND vs AUS 1st Test 2024: भारताची सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला आहे. रविवारी त्याने कांगारूंच्या गोलंदाजांना चपराक देत कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. पर्थमध्ये यशस्वीने 205 चेंडूत शतक पूर्ण करून मोठा विक्रम केला. कांगारूंच्या भूमीवर कमी वयात शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आता यशस्वीच्या नावाचा समावेश झाला आहे. सध्या जयस्वालचे वय 22 वर्षे 332 दिवस आहे, तर महान सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी शतक झळकावले होते. याशिवाय विराट कोहलीने वयाच्या 23 व्या वर्षी हा पराक्रम केला होता. या यादीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे नाव देखील समाविष्ट आहे, ज्याने वयाच्या 21 वर्षे 91 दिवसांत ऑस्ट्रेलियात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
जैस्वालने यावर्षी तीन शतके झळकावली आहेत. यासह त्याने वयाच्या 22 व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात तीन शतके ठोकण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनने हा पराक्रम 1992 मध्ये केला होता. ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा जैस्वाल आता एमएल जयसिम्हा आणि सुनील गावस्कर यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला आहे. यशस्वी ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा 23वा भारतीय फलंदाज ठरला आहे. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal New Record: ऑस्ट्रेलियाविरुद्ध यशस्वी जैस्वालने केला मोठा पराक्रम, ब्रेंडन मॅक्क्युलमचा विक्रम काढला मोडीत)
यशस्वी-राहुल जोडीने जोडल्या 201 धावा
ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी खेळणाऱ्या यशस्वीने पहिल्या डावातील निराशाजनक सुरुवातीतून सावरले आणि दमदार शतक झळकावले. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर तो नॅथन मॅकस्विनीकडे झेलबाद झाला. केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या जैस्वालने दुसऱ्या डावात पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर सहज धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली.
जैस्वालचे चौथे कसोटी शतक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक जयस्वालचे कसोटी क्रिकेटमधील चौथे आंतरराष्ट्रीय शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध दोन आणि वेस्ट इंडिजविरुद्ध एक शतके झळकावली होती. इंग्लंडविरुद्ध त्याची शतके भारतात झाली, तर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही कामगिरी वेस्ट इंडिजमध्येच केली. वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणाऱ्या जयस्वालने आतापर्यंत 15 सामने खेळले असून त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे.