Women's T20 Challenge 2020 Final: राधा यादवच्या अचूक माऱ्यासमोर Trailblazers ने टेकले गुडघे; Supernovas समोर 119 धावांचं आव्हान
ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यातील आजच्या सामन्यात महिला टी-20 चॅलेंज अंतिम सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 118 धावांपर्यंत मजल मारली आणि हरमनप्रीत कौरच्या संघाला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं.
Women’s T20 Challenge 2020 Final: ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि सुपरनोव्हास (Supernovas) यांच्यातील आजच्या सामन्यात महिला टी-20 चॅलेंज अंतिम सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) ट्रेलब्लेझरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 118 धावांपर्यंत मजल मारली आणि हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) संघाला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. ट्रेलब्लेझरची कर्णधार स्मृती मंधानाला आजच्या सामन्यात सूर गवसला आणि तिने संघासाठी सर्वाधिक 68 धावा केल्या. डिएंड्रा डॉटिनने 20 धावा केल्या. आजच्या सामन्यात स्मृतीचे ट्रेलब्लेझर पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहेत, तर सुपरनोव्हास विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुपरनोव्हास यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये स्पर्धेचे चॅम्पियन बनले आहेत. दुसरीकडे, सुपरनोव्हास गोलंदाजांना सुरुवातीला काही यश मिळाले नसले तरी राधा यादवने एकाच ओव्हरमध्ये ट्रेलब्लेझर झटके देत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. संघासाठी राधा यादवने (Radha Yadav) सर्वाधिक 5 तर पूनम यादव आणि शशिकला सिरीवर्डेन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. (TRA vs SUP, Women’s T20 Challenge 2020 Final: सुपरनोव्हासने जिंकला टॉस, पहिले घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय)
आजच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टॉस गमावून मंधाना आणि डॉटिन यांनी ट्रेलब्लेझर संघाला दमदार सुरूवात करून दिली. डॉटिन एकीकडे धावा करण्यासाठी संघर्ष करत होती, तर दुसऱ्या टोकावरून मंधानाने फटकेबाजी सुरूच ठेवली. दोघांमध्ये 71 धावांची भागीदारी झाली असताना पूनम यादवच्या चेंडूवर डॉटिनने चुकीचा शॉट खेळला आणि राधा यादवकडे झेलबाद होऊन माघारी परतली. या दरम्यान, मंधानाने स्पर्धेचे पहिले अर्धशतक ठोकले, पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात सिरीवर्डेनच्या चेंडूवर विकेटकीपर तानिया भाटियाने तिला स्टंप आऊट केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर ट्रेलब्लेझर विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. राधा यादवने एकाच ओव्हरमध्ये दोन झटके दिले. राधाने दीप्ती शर्मा 10 आणि रिचा घोषला 9 धावांवर माघारी धाडलं. ट्रेलब्लेझरची सुरुवात चांगली झाली असताना राधा यादवच्या भेदक माऱ्यासमोर ट्रेलब्लेझर फलंदाज ढेर झाले. मंधाना बाद होताच अन्य फलंदाजांना टिकून खेळण्यास संघर्ष करावा लागला.