Why Virat Kohli Not Playing Johannesburg Test: जोहान्सबर्ग कसोटीतून विराट कोहलीची माघार, ‘या’ कारणामुळे भारतीय कर्णधार दुसऱ्या सामन्याला मुकला

दुसऱ्या कसोटीत केएल राहुल नाणेफेकीसाठी उतरला असून कोहलीला पाठीचा वरचा भाग दुखत आहे, त्यामुळे तो या कसोटीत खेळत नसल्याचे त्याने सांगितले. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test 2022: भारतीय कसोटी संघाचा नियमित विराट कोहली (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुसऱ्या कसोटीत केएल राहुल (KL Rahul) नाणेफेकीसाठी उतरला असून विराट कोहलीला पाठदुखीचा त्रास होत असल्याने दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले. विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारीचा (Hanuma Vihari) संघात समावेश करण्यात आला आहे. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीला पाठीचा वरचा भाग दुखत आहे, त्यामुळे तो या कसोटीत खेळत नाही आहे. मात्र, केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत कोहली खेळण्याची शक्यता राहुलने वर्तवली आहे. (IND vs SA 2nd Test 2022: जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय, KL Rahul याच्या हाती भारताची कमान; पहा Playing XI)

दरम्यान, विराट कोहलीला जोहान्सबर्ग कसोटीतून वगळण्यात आल्याचा अर्थ असा आहे की तो यापुढे दक्षिण आफ्रिकेत त्याची 100 वी कसोटी खेळू शकणार नाही. कोहलीने आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. अशा परीस्थितीत तो जोहान्सबर्गमध्ये 99वी कसोटी आणि नंतर केपटाऊनमध्ये 100वी कसोटी खेळणार होता. पण, दुखापतीमुळे भारतीय चाहत्यांची त्याला शंभरावी कसोटी खेळण्याची प्रतीक्षा वाढली आहे. कोहली आता 25 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे श्रीलंकेविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळताना दिसू शकतो. दरम्यान जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये हनुमा विहारीची वर्णी लागली आहे. याशिवाय विराट कोहली दुसऱ्या कसोटीत न खेळणे टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. या मागे कारण म्हणजे जोहान्सबर्गमधील विराटचा चांगला रेकॉर्ड आहे.

विराट कोहली वांडरर्सच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे, तसेच जॉन रीडनंतर परदेशात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. जोहान्सबर्गमध्ये विराट कोहलीने 310 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर जॉन रीडच्या नावावर 316 धावा आहेत. म्हणजेच आता दुसरा कसोटी सामना खेळत नसल्यामुळे रीड यांचा विक्रम मोडण्याची संधी विराटच्या हातातून निसटली आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्याच्या तुलनेत टीम इंडियाने आपल्या प्लेइंग 11 मध्ये फक्त एक बदल केला आहे. उल्लेखनीय आहे की टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये एकही टेस्ट मॅच गमावलेली नाही आणि भारतीय संघ इथे अजेय आहे.