Virat Kohli’s First Audi R8 Car: विराट कोहलीची पहिली Audi R8 गाडी पोलिसांकडून जप्त; महाराष्ट्रातील पोलीस स्टेशन मध्ये पडली आहे धूळ खात (See Photo)

ऑडीच्या प्रत्येक नवीन मॉडेल लॉन्चवेळी विराट कोहलीला नवीन कार मिळते, अशावेळी प्रश्न उद्भवतो की प्रत्येकवेळी नवीन कार मिळाल्यावर विराट आपल्या जुन्या गाड्यांचे काय करत असेल? आता माहिती मिळत आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची जुनी कार सध्या महाराष्ट्रात पोलिस ठाण्यात उभी आहे.

Virat Kohli’s First Audi Car Seen Lying in the Police Station (Photo Credits: Facebook)

क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटचा किंग समजला जाणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावर नेहमीच विराट कोहलीची आक्रमकता दिसून आली आहे आणि क्रिकेट चाहत्यांनाही ते आवडते. सध्या विराट कोहलीचे नाव जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये घेतले जाते. म्हणूनच की काय विराटकडे डझनभर ब्रँडचे अ‍ॅम्बेसेडर आहेत. विराटला लक्झरी कारचा शौक आहे व म्हणूनच त्याच्याकडे बऱ्याच लक्झरी कार्स दिसून येतात. विराट ऑडी (Audi) इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील आहेत. ऑडीच्या कार लॉन्चिंगच्यावेळी तो हमखास त्या ठिकाणी हजर राहतो.

ऑडीच्या प्रत्येक नवीन मॉडेल लॉन्चवेळी विराट कोहलीला नवीन कार मिळते, अशावेळी प्रश्न उद्भवतो की प्रत्येकवेळी नवीन कार मिळाल्यावर विराट आपल्या जुन्या गाड्यांचे काय करत असेल? आता माहिती मिळत आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची जुनी कार सध्या महाराष्ट्रात पोलिस ठाण्यात उभी आहे. विराटची ही लक्झरी कार पोलिस ठाण्यात चक्क धूळ खात पडली आहे. पोलिस स्टेशनमध्ये उभी असलेली विराटची कार 2012 ऑडी आर 8 आहे. ही ऑडी कार विराट कोहलीची पहिली ऑडी आर 8 कार होती.

जेव्हा ऑडी इंडियाने नवीन आर 8 सादर केली तेव्हा भारतीय कर्णधाराने आपण वापरत असलेल्या जुन्या मॉडेलची विक्री करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये विराटने आपली ऑडी कार ब्रोकरमार्फत सागर ठक्कर नावाच्या व्यक्तीला विकली. एका वेबसाइट रिपोर्टनुसार, सागर नंतर एका घोटाळ्यामध्ये सामील असल्याचे आढळले. यामुळे पोलिसांनी त्याच्या इतर मालमत्तांच्या सोबत त्याची कारही जप्त केली. ही गाडी विकत घेतल्यावर अवघ्या दोनच महिन्यात ती जप्त करण्यात आली होती. (हेही वाचा: Global Instagram Influencersच्या पहिल्या 25 मध्ये भारतीयांच्या यादीत विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना स्थान, 'हा' जागतिक स्टार आहे नंबर 1)

ठक्करने ही ऑडी कार विराटकडून अडीच कोटींमध्ये खरेदी केली होती व विराटकडून याचे सर्व कागदपत्रे क्लीअर असल्याने सागरमुळे विराटला पुढे काही अडचणी आल्या नाहीत. सध्या महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यामध्ये याच गाडीवर धूळ आणि घाण साचत आहे. सागर ठक्करने ही कार विराटकडून आपल्या मैत्रिणीला भेट देण्यासाठी विकत घेतली होती.