लियोनेल मेस्सी की क्रिस्टियानो रोनाल्डो? कोण आहे विराट कोहली चा आवडता फुटबॉलपटू, जाणून घ्या
(Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला स्वतः फुटबॉल खेळायला आवडते आणि पोर्तुगालचा संघ त्याचा पसंतीचा आहे. 2104 फिफा विश्वचषकदरम्यान विश्वविजेते ठरलेल्या जर्मनीला कोहलीने पाठिंबा दर्शविला होता. पण, युरोपियन फुटबॉलचा विचार केला तर विराटचा आवडता क्लब जुव्हेंटस आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे क्रिस्तिआनो रोनाल्डो (Cristiano Ronaldo). क्रिकेट विश्वात जसे कोहली आणि स्टिव्ह स्मिथ पैकी सर्वोत्तम खेळाडू कोण असा वाद सुरु असतो, तसाच लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि रोनाल्डो यांच्यातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू कोण याविषयी फुटबॉल विश्वात नेहमीच वादविवाद होत असतो. याबाबत विराटने आता त्याची पसंतीदेखील दर्शवली आहे. (FIFA Awards 2019: लिओनेल मेस्सी सहाव्यांदा बनला फिफा फुटबॉलर ऑफ द इयर)

पोर्तुगाल आणि अर्जेंटिनामधील दोन सुपरस्टार्स फुटबॉलपटूंनी एक दशकभर आपल्या खेळाने जगावर राज्य केले आणि या दोंघांना फुटबॉलमध्ये सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानले जाते. पण, विराट नुसार रोनाल्डो मेस्सीपेक्षा वरचढ आहे. कोहलीने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “ही माझी वैयक्तिक निवड आहे. मेस्सी, पूर्णपणे नैसर्गिक प्रतिभा असलेला खेळाडू आहे. पण, माझे असे मत आहे की, आपल्यात जी काही क्षमता आहे ते प्रत्येक मॅचच्या प्रत्येक मिनिटाला कशी वापरली जाते. आणि यामध्ये रोनाल्डो सर्वात भिन्न आहे." विराट म्हणाला की त्याने पाहिलेल्या सर्व खेळाडूंपैकी रोनाल्डो सर्वात पूर्ण खेळाडू आहे. त्याचा डावा पाय, उजवा पाय, वेग आणि कौशल्य सर्व काही उत्कृष्ट आहे.

शिवाय, 1998 आणि 2002 मधील फुटबॉल विश्वचषक त्याच्या आवडत्या क्षणांपैकी एक असल्याचे विराटने उघड केले. यासह, भारतीय फुटबॉलच्या पातळीवरही कोहली खूष आहे आणि देशातील फुटबॉल योग्य दिशेने जाईल अशी आशा त्याने व्यक्त केली. दुसरीकडे, सध्या विराट 2 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करीत आहे. आफ्रिका संघाविरुद्ध टी-२० मालिका 1-1 ने ड्रॉ झाल्यानंतर कोहलीने एफसी गोव्याची नवीन जर्सी लाँच केली. यावेळी त्यांनी फुटबॉलशी संबंधित आपले अनुभव सांगितले.