The Hundred Tournament: कोरोना व्हायरसमुळे 100-बॉल क्रिकेट स्पर्धा 'हंड्रेड टूर्नामेंट' पुढे ढकलली; आता 2021 च्या उन्हाळ्यात होणार लाँचिंग
या संकटामुळे अनेक देशांत लॉक डाऊन चालू आहे व लोक आपापल्या घरातच आहेत. या साथीच्या आजारामुळे अनेक खेळांच्या स्पर्धा, इव्हेंट्स रद्द करण्यात आले आहेत
कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता उद्रेक आणि भीतीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या संकटामुळे अनेक देशांत लॉक डाऊन चालू आहे व लोक आपापल्या घरातच आहेत. या साथीच्या आजारामुळे अनेक खेळांच्या स्पर्धा, इव्हेंट्स रद्द करण्यात आले आहेत. याचा फटका आयपीएल पासून ते ऑलिम्पिकपर्यंतच्या खेळांना बसला आहे. असे सामने एक तर रद्द तरी झाले अथवा पुढे ढकलले. आता यामध्ये अजून एका स्पर्धेची भर पडली आहे ती म्हणजे, द हंड्रेड टूर्नामेंट (The Hundred Tournament). इंग्लंड क्रिकेटची वादग्रस्त 'द हंड्रेड' स्पर्धा कोरोना विषाणूच्या साथीमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
प्रति संघ शंभर चेंडूंच्या स्वरूपातली ही नवीन स्पर्धा आठ संघांदरम्यान खेळली जाणार होती. याची सुरुवात जुलैमध्ये होणार होती पण आता इंग्रजी सत्र 1 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले आहे आणि त्यानंतरचे सामने प्रेक्षकांशिवाय असतील. अशा परिस्थितीत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा 2021 मध्ये आयोजित केली जाणार आहे.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी निवेदनात म्हटले आहे की, 'सध्याच्या परिस्थितीत यावर्षी ही स्पर्धा घेणे शक्य नाही. आम्ही आशा करतो की पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळली जाईल.' याआधी, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीनेही बुधवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत नवीन 'द हंड्रेड' स्पर्धा काही काळानंतर घेण्यास सुचविले होते. यापूर्वी आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करावे लागले, तर अनेक क्रिकेट मालिकाही रद्द कराव्या लागल्या आहेत. इतकेच नाही तर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबद्दलही शंका आहे. (हेही वाचा: जपानचे प्रधानमंत्री शिंजो अबे यांनी ऑलिम्पिकवर केले मोठे विधान, कोरोना व्हायरसवर मात केल्याशिवाय टोकियो खेळाचे आयोजन कठीण)
दरम्यान, जुलै 2020 मध्ये ही लीग ३८ दिवस चालणार होती. यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. फॉर्मेटनुसार प्रत्येक संघाला त्यांच्या घरी चार सामने खेळायचे होते. या लीगचे नियम खूपच वेगळे आहेत. यानुसार प्रत्येक डावात 100 चेंडू फेकले जातील आणि प्रत्येक 10 चेंडूंनंतर फलंदाज बदलू शकतील. गोलंदाज सलग 5 किंवा 10 चेंडू टाकू शकतो, त्याला किती चेंडू टाकू द्यायचे हे कर्णधार ठरवतो. एका डावात, एक गोलंदाज 20 चेंडूपेक्षा जास्त गोलंदाजी करू शकणार नाही.