Asia Cup 2021: श्रीलंका पुढील वर्षी करणार एशिया कपचे आयोजन तर पाकिस्तानकडे 2022 मध्ये आयोजनाचे अधिकार, PCB CEO वसीम खान यांची माहिती

पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वसीम खान यांच्यानुसार, श्रीलंका जून 2021 मध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करेल, तर पाकिस्तानने 2022 मध्ये एक वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्याचे हक्क मिळवले आहेत.

वासिम खान (Photo Credits: Getty Images)

COVID-19 महामारीमुळे क्रीडा स्पर्धेचे अनेक कार्यक्रम स्थगित किंवा रद्द झाले. क्रिकेटमध्ये आशिया चषक (Asia Cup) 2020 बाबत चर्चा होऊनही स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आता या वर्षाची आवृत्ती पुढे ढकलल्याबद्दल आणि 2022 मध्ये आयोजित करण्यासंदर्भात एक परिभाषित अपडेट दिले आहे. पीसीबीचे (OCB) मुख्य कार्यकारी अधिकारी, वसीम खान (Wasim Khan) यांच्यानुसार, श्रीलंका जून 2021 मध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करेल, तर पाकिस्तानने 2022 मध्ये एक वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्याचे हक्क मिळवले आहेत. “पुढील आशिया चषक स्पर्धेचे आयोजन जूनमध्ये श्रीलंकेत (Sri Lanka) होईल आणि 2022 च्या आशिया चषक स्पर्धेसाठी आता आम्हाला होस्टिंगचे अधिकार मिळाले आहेत,” खान यांचे म्हणणे PTI ने उद्धृत केले. मूळ वेळापत्रकानुसार आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती पण कोविडमुळे ते होऊ शकले नाही. (T20 World Cup 2021: भारतात कोविडमुळे 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजनावर अनिश्चितता, UAE मध्ये स्पर्धा हलवली जाण्याचा PCB चा अजब दावा)

श्रीलंका क्रिकेटने पीसीबीकडून होस्टिंगचे हक्क घेतल्यामुळे आता हा कार्यक्रम जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे आणि नुकसान भरपाई म्हणून, पीसीबीला 2022 आवृत्तीच्या आयोजनाचे अधिकार देण्यात आले आहेत. द्विपक्षीय मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानात येण्यासाठी पीसीबी प्रयत्नशील आहे. झिम्बाब्वे, बांग्लादेश व श्रीलंका यासारख्या देशांनी मागील 12 महिन्यांत पाकिस्तानचा दौरा केला आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या सहभागाचा विचार करता संपूर्ण एशिया आशिया चषक आयोजित करणे हे मोठे टास्क आहे. पाकिस्तानात क्रिकेट खेळल्याबद्दल भारताव्यतिरिक्त अन्य काही संघ आणि खेळाडूंना भीती वाटत आहे.

पीसीबीला मात्र 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला देशातील द्विपक्षीय मालिकेसाठी पटवून देण्यात यश मिळविले असून 2006 नंतर इंग्लंड संघ देखील पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज आहे. 2020 आशिया कप स्पर्धेला स्थगिती देण्यात आली नव्हती तेव्हाही पाकिस्तानऐवजी युएईमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची चर्चा रंगली होती कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौर्‍यावर येण्यास नकार दिला होता. 2022 स्पर्धेला अद्याप बराच काळ असला तरी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता कमीच दिसत आहे. असाच वाद निर्माण झाल्यास पीसीबीला पुन्हा एकदा आशिया चषक युएईला हलवावे लागण्याची शक्यता आहे.