Rahul Dravid, Virender Sehwag यांच्या मुलांची India U19 Squad मध्ये निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केलेल्या १९ वर्षांखालील संघात माजी कर्णधार राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग यांची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात हे दोघेही एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्धच्या आगामी दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारतीय 19 वर्षांखालील संघात दोन दिग्गज माजी क्रिकेटपटूंच्या मुलांचा समावेश झाला आहे. माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मुलगा अन्वय द्रविड (Anvay Dravid) आणि माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग (Aaryavir Sehwag) या दोघांचीही एकदिवसीय संघात निवड झाली आहे.
अन्वय द्रविडची निवड
राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड याला एकदिवसीय मालिकेच्या संघात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे. कर्नाटकाकडून खेळणाऱ्या अन्वयने विजय मर्चंट करंडक (१६ वर्षांखालील) स्पर्धेत सहा सामन्यांत ४५९ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर विनू मंकड करंडक स्पर्धेतही त्याने कर्नाटकचे नेतृत्व करत सहा सामन्यांत २२० धावा केल्या होत्या, ज्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध नाबाद ८२ धावांच्या खेळीचा समावेश होता.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हैदराबाद येथे झालेल्या चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेसाठीही अन्वयची निवड झाली होती. त्याचा मोठा भाऊ समित द्रविड यानेही यापूर्वी भारतीय १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
आर्यवीर सेहवागची निवड
वीरेंद्र सेहवाग यांचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवाग यालाही याच संघात संधी मिळाली आहे. दिल्लीकडून १९ वर्षांखालील स्तरावर खेळणाऱ्या आर्यवीरने कूच बिहार करंडक स्पर्धेत मेघालयविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती, तर मणिपूरविरुद्ध २९७ धावांची स्फोटक खेळी करत लक्ष वेधले होते.
अलीकडेच झालेल्या दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेतही आर्यवीरने आपल्या वडिलांप्रमाणेच आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली. सेंट्रल दिल्ली किंग्जकडून खेळताना त्याने माजी आरसीबी गोलंदाज नवदीप सैनीविरुद्ध सलग चौकार लगावले होते.
दौऱ्याचे स्वरूप
ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने राजकोट आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. एकदिवसीय संघाचे नेतृत्व लक्ष्य राईचंदानी याच्याकडे असेल, तर यशवर्धन चौहान उपकर्णधार असेल.
भारतीय क्रिकेटमध्ये माजी दिग्गज खेळाडूंच्या मुलांनी युवा स्तरावर आपली छाप पाडण्याची परंपरा कायम आहे. राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले असून, त्यांना क्रिकेट क्षेत्रातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. वीरेंद्र सेहवाग हे कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारे एकमेव भारतीय फलंदाज आहेत. आता त्यांची मुले याच वारशाचा पुढचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.