IND vs WI ODI 2019: टी-20 नंतर शिखर धवन वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता, वाचा सविस्तर

बंगळुरू मिरर मधील एका वृत्तानुसार, धवनला दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक वेळेची गरज आहे आणि निवड समिती 15 डिसेंबरला त्याच्या जागी संघात कोण घेईल याची घोषणा करेल.

शिखर धवन (Photo Credits: Getty)

दुखापतीमुळे टी-20 मालिका न खेळू शकणारा टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यावर वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध वनडे मालिकेलाही मुकण्याची शक्यता ओढवली आहे. धवनला सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि वनडे या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघात (Indian Team) स्थान मिळाले होते, परंतु सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. नंतर त्याने ट्विट केले होते की तो ‘4-5’ दिवसात बारा होईल पण ही दुखापत अधिक गंभीर असल्याचे दिसत आहे. टी-20 मालिकेसाठी धवनच्या जागी संजू सॅमसन (Sanju Samson) याची निवड करण्यात आली होती. शिखरला दुखापतीमुळे मोठा धक्का बसला होता कारण अलीकडच्या काळात त्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने कसोटी संघात यापूर्वीच आपले स्थान गमावले आहे आणि मर्यादित षटकांच्या स्वरूपामध्येही त्याच्यासाठी वेळ संपत आहे. सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरु आहे. (भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने घेतला मोठा निर्णय)

दरम्यान, धवनच्या विळख्यात आणखी वाढ झाली आहे कारण तो आता वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. बंगळुरू मिरर मधील एका वृत्तानुसार, धवनला दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक वेळेची गरज आहे आणि निवड समिती 15 डिसेंबरला पहिल्या वनडे सामन्यापूर्वी त्याच्या जागी संघात कोण घेईल याची घोषणा करेल. धवनच्या जागी टी-20 संघात शामिल झालेल्या संजूला विंडीजविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यासाठी प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. वनडे मालिकेसाठी धवनच्या जागी सॅमसनला संघात स्थान मिळेल असेही अहवालात म्हटले आहे. शिवाय, शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल याचाही समावेश करण्याबाबत विचार केला जात आहे.

कॅरेबियन संघाविरुद्ध भारत तीन वनडे सामने खेळणार आहे. पहिला सामना चेन्नईमध्ये 15 डिसेंबर, विशाखापट्टणममध्ये 18 डिसेंबरला दुसरा सामना आणि अंतिम सामना कटकमध्ये 22 डिसेंबरला खेळला जाईल. सध्या सुरु असलेल्या टी-20 मालिकेत दोन्ही संघाने एक-एक सामने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. आता भारत-विंडीजमध्ये अंतिम आणि निर्णायक सामना 11 डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाईल.