Rohit Sharma बाबत मीम शेअर करणे स्विगीला पडले महागात; ट्वीटरवर #BoycottSwiggy ट्रेंड, फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने मागितली माफी
हळू हळू लोकांनी स्विगीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करायला सुरुवात केली व ही गोष्ट ट्रेंडिंग झाली. त्यानंतर स्विगीने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली
सध्या आयपीएल 2021 (IPL 2021) ची धूम चालू आहे. याद्वारे खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे, अचानक सोशल मीडियावर रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते SWIGGY या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर बहिष्कार घालण्याची मागणी करताना दिसत आहे. ट्विटरवर #BoycottSwiggy टॉप ट्रेंड होत आहे. रोहित शर्माच्या एक मीमवर स्विगीने लेलेल्या कमेंटमुळे ही कंपनी अडचणीत आली आहे. या मीममध्ये रोहितची चेंडू पकडण्यासाठी डाइव्हिंग करत असतानाची एक्शन दिसत आहे. मात्र तो चेंडू नाही तर एका स्टॉलवरून वडापाव पकडण्यासाठी डायव्हिंग करीत असल्याचे दाखवले आहे.
एका चाहत्याने ब्रॉडकास्टर आणि स्टार स्पोर्ट्स प्रेझेंटर मयंती लंगर यांना प्रत्युत्तर म्हणून हा मीम शेअर केला होता, ज्याने #SwiggyForkcast contest स्पर्धेत देखील भाग घेतला होता. हा मीम स्विगीने आपल्या खात्यावर रिट्वीट केला होता.
आयपीएल 2021 ची सुरुवात, 9 एप्रिल (शनिवार) रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्याने झाली. यावेळी स्विगीने आपली #SwiggyForkcast स्पर्धादेखील सुरू केली जिथे चाहत्यांनी थेट सामन्याशी संबंधित काहीतरी भविष्यवाणी करायची होती. जर त्यांची भविष्यवाणी खरी ठरली तर त्यांना स्विगीकडून विनामूल्य फूड मिळणार होते. मयंती लंगर बिन्नीनेही या स्पर्धेत भाग घेतला व तिने लिहिले होते, जर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने 200 पेक्षा जास्त धावा केल्या तर तिला वडापाव हवा आहे.
त्यानंतर एका चाहत्याने या ट्वीटला प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा डाइव्हिंग करत वडापाव पकडण्यासाठी जात असल्याचा मीम शेअर केला. कदाचित स्विगीला हा मीम खूपच आवडला असावा कारण त्यांनी, ‘Haters will say it’s photoshopped!’ असे म्हणत हा मीम आपल्या खात्यावर शेअर केला. स्विगीच्या दृष्टीने ही कदाचित अतिशय छोटी गोष्ट असावी, मात्र यामुळे रोहित शर्माचे चाहते फारच चिडले व त्यांनी स्विगीवर टीका करायला सुरवात केली. (हेही वाचा: कोलकाता नाईट राईडर्सच्या हातातून सामना निसटला; मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी विजय)
स्विगीने आपल्या देशातील खेळाडूंचा मान राखायला हवा असे रोहितच्या चाहत्यांचे म्हणणे होते. हळू हळू लोकांनी स्विगीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करायला सुरुवात केली व ही गोष्ट ट्रेंडिंग झाली. त्यानंतर स्विगीने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. ते म्हणाले, हा मीम आम्ही तयार केला नव्हता व यातून कोणालाही कमी लेखण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही नेहमीच पलटनसोबत आहोत.’