विराट कोहलीच्या कसोटी कर्णधार उत्तराधिकारीच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे भाष्य, म्हणाले- ‘अजिंक्य रहाणे आवडेल, पण...’
केएल राहुल, रोहित शर्मा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह हे विराट कोहलीचे कसोटी कर्णधार पदाचे उत्तराधिकारी बनण्याचे उमेदवार आहेत. वॉर्नला वाटते की अजिंक्य रहाणे हा योग्य पर्याय असू शकतो, परंतु बॅटने त्याचा फॉर्म चांगला राहिला नाही.
भारताच्या पुढील कसोटी कर्णधाराची निवड हा एक असा प्रश्न आहे ज्याचे भारतीय क्रिकेट विश्वातील अनेकांकडे स्पष्ट उत्तर नाही. भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) नेतृत्व करताना विराट कोहलीने (Virat Kohli) जे मानके स्थापित केले आहेत ते अतुलनीय आहेत आणि अजून कोणीही त्याच्या जवळ आलेले नाही. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून चमकदार विक्रम करणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या शर्यतीत देखील नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिसरा कसोटी सामना आणि मालिका गमावल्यावर कोहलीने नेतृत्व पदावरून पायउतार होण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. आणि आता कसोटी कर्णधार म्हणून त्याचा उत्तरराधिकारी कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक माजी खेळाडूंनी वेगवेगळी नावे सुचवली आहे आणि यामध्ये आता ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे (Shane Warne) नाव देखील सामील झाले आहे. महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नने या विषयावर स्पष्ट उत्तर दिले. (Indian Cricket Team: रोहित शर्मा का बनू नये भारताचा कसोटी कर्णधार? माजी दिग्गज फलंदाजाने स्पष्ट केले कारण)
भारतीय संघातील रिक्त कर्णधाराची जागा लक्षात घेऊन वॉर्नला वाटते की रोहित शर्मा हा पुढचा कर्णधार असावा कारण केएल राहुलला जबाबदारीची सवय होण्यासाठी अजून थोडा वेळ हवा आहे. तथापि, वॉर्नची पहिली पसंती अजिंक्य रहाणेला असता, परंतु त्याचा बॅटने खराब फॉर्म त्याला भारताच्या कसोटी संघातूनही बाहेर काढू शकतो. “रोहितने छोट्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो आवडता असेल. केएल राहुल हे करू शकतो, मला रहाणे म्हणायला आवडेल, पण त्याने फॉर्म गमावला आहे. रहाणे फॉर्ममध्ये असेल किंवा त्याला तो फॉर्म पुन्हा दिसला तर तो करू शकतो. तो खूप चांगला कर्णधार आहे. भारताकडे खूप सारे पर्याय आहेत हे भाग्यवान आहे पण मला वाटते की रोहितला कर्णधारपद मिळेल.” वॉर्नने ANI वृत्तसंस्थेला सांगितले.
रिषभ पंत हा आणखी एक उमेदवार आहे ज्याबद्दल अनेकांनी चर्चा केली आहे. वॉर्न मात्र युवा यष्टिरक्षकाला भूमिका देण्यास उत्सुक नाही. विशेष म्हणजे वॉर्नला वाटले की जसप्रीत बुमराह देखील चांगला पर्याय असू शकतो. टीम इंडिया पुढील कसोटी मालिका मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या पुढील कसोटी कर्णधाराची घोषणा फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहे.