Indian Cricket Team: रोहित शर्मा का बनू नये भारताचा कसोटी कर्णधार? माजी दिग्गज फलंदाजाने स्पष्ट केले कारण
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Indian Cricket Team: विराट कोहलीने (Virat Kohli) गेल्या आठवड्यात आपल्या कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर भारताच्या पुढील कसोटी कर्णधाराची शोधाशोध सुरु झाली आहे. कर्णधाराच्या भूमिकेसाठी उपकर्णधार हा नैसर्गिक उत्तराधिकारी असला तरी, कोहलीनंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) पाहण्यास उत्सुक नसलेले लोक देखील आहेत. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) त्यापैकी एक असून त्यांनी स्पष्ट केले आहे की ‘हिटमॅन’ योग्य निवड का नाही. रोहितची नुकतीच भारताचा टी-20 आणि वनडे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व त्याला कसोटीमध्ये उपकर्णधार म्हणूनही बढती देण्यात आली होती. तो आता कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीतही सापडला आहे, परंतु गावस्करला असे वाटते की फिटनेसच्या समस्येमुळे त्याला संघाची कमान दिली जाऊ नये. (Virat Kohli Test Captaincy Successor: नवीन टेस्ट कर्णधारासाठी सुनील गावस्करांनी सुचवले Rishabh Pant चे नाव, ‘या’ महान भारतीय खेळाडूचे उदाहरण दिले)

“रोहितची समस्या ही आहे की त्याच्या फिटनेसच्या समस्या आहेत. त्यामुळे तुम्हाला अशा खेळाडूची गरज आहे जो तंदुरुस्त राहील आणि सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल. जर तुम्हाला आठवत असेल तर, श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला हॅमस्ट्रिंगची अशीच समस्या होती. आणि त्यासोबत, जेव्हा तुम्ही वेगाने धावण्याचा प्रयत्न करता किंवा झटपट सिंगल घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा दुखापत पुन्हा होते,” गावसकर यांनी Sports Tak वर स्पष्ट केले. “जर असे घडायचे असेल, तर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कर्णधाराचे नाव देण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे त्याऐवजी बाह्य दुखापती असलेल्या खेळाडूची निवड करणे चांगले आहे. पण रोहितसोबत नियमित दुखापतींच्या या चक्रामुळे मला त्याच्याबद्दल साशंकता आहे. त्यामुळेच मला असे वाटते की सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूलाच कर्णधार बनवायला हवे.” दुखापतींमुळे रोहित संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही मुकला होता.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार रोहित शर्माला लवकरच नवीन कर्णधार म्हणून पदोन्नती दिली जाईल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर बीसीसीआय रोहितच्या नावाची कसोटी कर्णधार म्हणून अधिकृत घोषणा करेल. भारताचा नवा कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या पदोन्नतीची घोषणा दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर लगेचच केली जाण्याची शक्यता आहे.