IND vs NZ 1st Test 2024: बंगळुरू कसोटी पराभूत होताच रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, धोनी-गांगुलीच्या क्लबमध्ये झाला सामील

Rohit Sharma (Photo Credit - X)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 8 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. हा सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडला भारताकडून केवळ 107 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे न्यूझीलंड संघाने दोन गडी गमावून पूर्ण केले. भारताने हा सामना गमावताच कर्णधार रोहितच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. (हे देखील वाचा:New Zealand vs South Africa Head to Head: न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका महिला संघांमध्ये अंतिम सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी )

धोनी-गांगुलीच्या क्लबमध्ये झाला सामील

रोहित आता कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने घरच्या मैदानावर 14 सामने खेळले आणि त्यापैकी तीन सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे घरच्या मैदानावर तीन कसोटी गमावणारा रोहित हा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने हरलेला कर्णधार कोण?

त्याच्या आधी बिशन सिंग बेदी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावरही हा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. मोहम्मद अझरुद्दीन आणि कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला घरच्या मैदानावर प्रत्येकी चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावणारा कर्णधार एमके पतौडी आहे, ज्याने नऊ सामने गमावले आहेत. विराट कोहलीबद्दल सांगायचे तर, तो कर्णधार असताना केवळ दोनदाच संघ घरच्या मैदानावर हरला.

कसा झाला सामना?

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला, जिथे संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 402 धावा केल्या आणि 356 धावांची मोठी आघाडी घेतली. रचिन रवींद्रने संघासाठी 134 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, भारताने दुसऱ्या डावात चांगला खेळ करत सरफराज खानच्या शतकाच्या जोरावर 462 धावा केल्या. सरफराजशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 99 धावांची खेळी केली. न्यूझीलंडला भारताकडून मिळालेले 107 धावांचे लक्ष्य त्यांनी दोन गडी गमावून सहज गाठले.