Rohit Sharma Duck Out: बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही, आशिया चषकात नकोसा विक्रम रचला

या डकसह, तो या स्पर्धेत सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद करणारा संयुक्त खेळाडू बनला आहे. याआधी चार खेळाडूंमध्ये बांगलादेशचे दोन आणि पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी एक खेळाडू आहे.

Rohit Sharma (Photo credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मध्ये 194 धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये होता. पण बांगलादेशविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. जर त्याने आज 60 धावा केल्या असत्या तर तो यंदाच्या आशिया चषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या कुसल मेंडिसला मागे टाकून अव्वल स्थानावर येऊ शकला असता. पण आजच्या सामन्यात बांगलादेशकडून वनडे पदार्पण करणाऱ्या तन्झीम शकीबने रोहितला खातेही उघडू दिले नाही आणि पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह, शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितच्या नावावर एक नकोसा विक्रमही जमा झाला.

एकदिवसीय आशिया चषकाच्या इतिहासात रोहित शर्माचे हे तिसरे शून्य ठरले. या डकसह, तो या स्पर्धेत सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद करणारा संयुक्त खेळाडू बनला आहे. याआधी चार खेळाडूंमध्ये बांगलादेशचे दोन आणि पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी एक खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो एकूण 15 वेळा खाते न उघडता बाद झाला आहे. रोहित शर्माने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध त्याने सलग तीन अर्धशतकांच्या खेळी खेळल्या होत्या. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 200 झेल घेणारा ठरला पाचवा भारतीय)

एकदिवसीय आशिया चषकात सर्वाधिक डक

रुबेल हुसैन (बांगलादेश)- 3

सलमान बट (पाकिस्तान)- 3

महेला जयवर्धने (श्रीलंका)- 3

अमिनुल इस्लाम (बांगलादेश)- 3

रोहित शर्मा (भारत)- 3

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेश संघाने प्रथम खेळताना 8 विकेट गमावत 265 धावा केल्या होत्या. संघाची फलंदाजी सुरुवातीलाच ढासळली आणि त्यांनी 28 धावांवर तीन आणि 59 धावांवर चार विकेट गमावल्या. त्यानंतर शाकिब अल हसनच्या 80 धावांच्या खेळी आणि तौहीद हार्डॉयच्या 54 धावांच्या खेळीने बांगलादेशचा डाव सावरला. शेवटी नसूम अहमदच्या 44 धावांच्या शानदार खेळीने संघाची धावसंख्या 265 पर्यंत नेली. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि वृत्त लिहिपर्यंत बांगलादेशचा नवोदित तनझिम इस्लामने रोहित शर्माला शून्यावर बाद केले आणि पदार्पण करणारा तिलक वर्मा 5 धावांवर क्लीन बोल्ड झाला.