Ranji Trophy: झारखंड संघाच्या धावांचा ‘एव्हरेस्ट’, नागालँडविरुद्ध 31 वर्षे जुना विक्रम धुळीस मिळवला; कुशाग्र, विराट आणि नदीम यांनी केली कमाल
झारखंडने नागालँड विरोधात रणजी ट्रॉफी 2021-22 प्री-क्वार्टर फायनल सामन्यात 32 वर्षे जुना विक्रम धुळीस मिळवला. झारखंडने जवळपास अडीच दिवस फलंदाजी केली आणि 880 धावा केल्या.
कोलकातामध्ये झारखंड (Jharkhand) आणि नागालँड (Nagaland) यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) प्री-क्वार्टर फायनलचा सामना धावांनी सजला आणि झारखंडने रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक सांघिक धावसंख्या नोंदवली. ईडन गार्डन्सवर नागालँडचा कर्णधार रोंगसेन जोनाथन याने नाणेफेक जिंकून झारखंडला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. तथापि नागालँड संघाचा हा निर्णय त्यांच्याच अंगी उलटला आणि झारखंड फलंदाजांनी गोलंदाजांची क्लास घेतली. झारखंडने नागालँड विरोधात रणजी ट्रॉफी 2021-22 प्री-क्वार्टर फायनल सामन्यात 32 वर्षे जुना विक्रम धुळीस मिळवला. झारखंडने जवळपास अडीच दिवस फलंदाजी केली आणि 880 धावा केल्या. यादरम्यान कुमार कुशाग्रने (Kumar Kushagra) द्विशतक केले, तर विराट सिंह (iVirat Singh) आणि शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) यांनी शतकी पल्ला गाठला. नागालँडने झारखंडला 203.4 षटकांत ऑलआऊट केले.
यासह झारखंडने रणजी ट्रॉफी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा 32 वर्षांचा जुना विक्रम मोडला, तरीही इतिहास रचण्यात ते 65 धावांनी मागे राहिले. या सामन्यात झारखंडला चांगली सुरुवात मिळाली, पण अव्वल 4 फलंदाजांपैकी केवळ एका खेळाडूने अर्धशतकी खेळी केली. अशा स्थितीत धावा करण्याची जबाबदारी खालच्या मधल्या फळी आणि तळाच्या फलंदाजांनी घेतली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने 153 चेंडूंत 13 चौकारांसह 107 धावांची खेळी केली. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेला यष्टिरक्षक फलंदाज कुमार कुशाग्रने द्विशतक ठोकले. कुशाग्रने 270 चेंडूंचा सामना करत 37 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 266 धवनची मोठी खेळी केली. कुशाग्र बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 7 बाद 655 धावा होती, पण झारखंड संघ यावर समाधानी नव्हता.
8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शाहबाज नदीम याने देखील शतक ठोकले आणि 304 चेंडूत 22 चौकार आणि दोन षटकारांसह 177 धावांची शानदार खेळी केली. अशा परिस्थितीत आता प्रश्न पडतो की झारखंडने इतक्या धावा का केल्या? रणजी ट्रॉफीसाठी बीसीसीआयच्या नियमानुसार, पहिल्या डावात जो संघ जास्त धावा करेल त्यांना सामना अनिर्णित राहिला तरी जास्त गुण मिळतील आणि बाद फेरीतील दुसऱ्या संघाचा प्रवास संपेल. म्हणूनच झारखंड संघाने मोठी धावसंख्या उभारली आहे, ज्यामुळे नागालँडचा संघ किमान पहिल्या डावात या धावसंख्येपेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला किंवा अनिर्णित राहिल्यास झारखंडला उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळेल.