PCB प्रमुख रमीज राजाची कबुली; भारताच्या पैशाने चालत आहे पाकिस्तान क्रिकेट, जर पंतप्रधानांनी निधी थांबवला तर आम्ही उद्ध्वस्त होऊ

राजा म्हणाले, “भारत आयसीसीला 90% निधी देतो. त्यानंतर आयसीसी आम्हाला पैसे देते. त्यामुळे एक प्रकारे भारताच्या पैशाने पाकिस्तान क्रिकेट चालत आहेत. जर भारताच्या पंतप्रधानांनी आम्हाला पैसे देणे बंद केले तर पाकिस्तान क्रिकेट नष्ट होईल.”

भारत-पाकिस्तान (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Rameez Raja) यांनी भारताचे क्रिकेटची महासत्ता असे वर्णन करून एक महत्त्वपूर्ण कबुलीजबाब सादर केला. राजा म्हणाले, “भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (International Cricket Council) 90% निधी देतो. त्यानंतर आयसीसी (ICC) आम्हाला पैसे देते आणि स्पर्धेचे आयोजन करते. त्यामुळे एक प्रकारे भारताच्या पैशाने पाकिस्तान क्रिकेट चालत आहेत. जर भारताच्या पंतप्रधानांनी आम्हाला पैसे देणे बंद केले तर पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) नष्ट होईल.” रमीज यांनी हे विधान सीनेट स्थायी समितीच्या आंतर-प्रांतीय समन्वय बैठकी दरम्यान केले. रमीझ पुढे म्हणाले, “ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणापेक्षाही, भारतापेक्षा (India) जास्त क्रिकेट फंड इतर कोणत्याही देशाकडे नाही.” पाकिस्तान आणि भारत (PAK vs IND) यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत, त्यामुळे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया स्पर्धांमध्ये सहभागी होतात. (India vs Pakistan, ICC T20 World Cup 2021: भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे काही तासातच संपली!)

एका खासदाराने राजा यांना विचारले, “पण आम्हाला आयसीसीकडून पैसे मिळतात.” यावर राजा म्हणाले, “ऑस्ट्रेलिया भारतासमोर उभा राहणार नाही. आत्ताच काय झाले ते तुम्ही पाहिले आहे. त्यांनी (न्यूझीलंड संघ) त्यांचे सामान बांधले आणि दोन मिनिटांत न खेळता पाकिस्तान सोडले. याचे कारण म्हणजे आपली अर्थव्यवस्था कुठेच नाही.” आणखी एका खासदाराने राजाला विचारले, “पाकिस्तान आयसीसीला किती योगदान देते?” प्रतिसादात राजा म्हणाले, “काही नाही. आमचे योगदान शून्य आहे.” या दरम्यान राजा यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, “एका गुंतवणूकदाराने मला वचन दिले आहे की जर पाकिस्तानने टी-20 विश्वचषकात भारताचा पराभव केला तर तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक कोरा चेक देईल.” अशा परिस्थितीत पाकिस्तानला  भारताविरुद्ध सामना कोणत्याही किंमतीत जिंकू इच्छित असेल. पाकिस्तानची आर्थिक स्थिती देखील वाईट आहे कारण पाकिस्तानमध्ये होणाऱ्या दोन मोठ्या मालिका सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्या आहेत. टी-20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता, पण दोघांनीही मालिका खेळण्यास नकार दिला.

मात्र, राजा यांनी आयसीसीवर गंभीर आरोपही केले आहेत. पीसीबी प्रमुख म्हणाले, “आयसीसी ही राजकीयदृष्ट्या रंगीत संस्था आहे जी आशियाई आणि पाश्चात्य गटांमध्ये विभागली गेली आहे आणि त्याच्या 90 टक्के महसूल भारतातून येतो.” राजा यांनी बैठकीत भर दिला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निधीपेक्षा पीसीबी अधिक स्वावलंबी असणे आवश्यक आहे. म्हणजेच एक प्रकारे राजाने स्पष्ट केले की भारताने हात मागे खेचला तर पाकिस्तान रस्त्यावर येईल.