PBKS vs CSK IPL 2021: धोनीच्या सुपर किंग्सचं दणक्यात कमबॅक, पंजाब किंग्सवर 6 विकेटने केली मात

पंजाब संघाने यापूर्वी पहिले फलंदाजी करत 106 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून लक्ष्य पूर्ती केली.

मोईन अली, पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/@IPL)

PBKS vs CSK IPL 2021: पंजाब विरोधात (Punjab Kings) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल (IPL) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) 6 विकेटने एकतर्फी विजय मिळवला आणि स्पर्धेत दोन सामन्यातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. पंजाब संघाने यापूर्वी पहिले फलंदाजी करत 106 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून लक्ष्य पूर्ती केली. सुपर किंग्सकडून मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 46 धावा केल्या तर फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) 36 धावा आणि सॅम कुरन 5 धावा करून नाबाद परतले. याशिवाय सलामी फलंदाज रुतुराज गायकवाड 5 धावाच करू शकला. पंजाब किंग्ससाठी मोहम्मद शमीला (Mohammed Shami) 2 तर मुरुगन अश्विन आणि अर्शदीप सिंह यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे. दरम्यान, पंजाब किंग्सचा आयपीएल 14 मधील हा पहिला पराभव ठरला आहे. यापूर्वी संघाकडून शाहरुख खानने 47 धावांची निर्णायक खेळी केली होती. (PBKS vs CSK IPL 2021: 4 विकेट घेताच Deepak Chahar याने केला विक्रमांचा भडीमार, असा कारनामा करणारा बनला पहिलाच गोलंदाज)

केएल राहुलच्या पंजाबने दिलेल्या 107 धावांच्या माफक धावसंख्येचा प्रत्युत्तरात चेन्नईसाठी रुतुराज आणि डु प्लेसिसच्या जोडीने सुरुवात केली. संघाला अर्शदीपने 24 धावसंख्येवर पहिला धक्का दिला. गायकवाड 5 धाव करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तंबूत परतला. त्यानंतर, मोईनने डु प्लेसिससह संघाचा डाव सावरला. दोंघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. चेन्नईने पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 32 धावा केल्या. मोईनचे अर्धशतक चार धावांनी हुकले. 46 धावांवर खेळताना मोठा फटका खेळण्याच्या प्रत्नात मोईनने चेंडू हवे खेळला पण तो अधिक लांब जाऊ शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर शाहरुख खानने त्याचा सोपा कॅच पकडला. संघ विजयाच्या जवळ असताना सुरेश रैना आणि अंबाती रायुडूच्या रूपात दोन विकेट गमावल्या.

यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स विरोधात चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 4 विकेट्स घेत संघाला मोठाही धावसंख्या करण्यापासून रोखले. यासह चाहरने आयपीएलमध्ये आपल्या सर्वोत्तम गोलंदाजी रेकॉर्डची नोंदही केली. दुसरीकडे, भारताचा वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार एमएस धोनीनेवानखेडेवर आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएल इतिहासात एका चेन्नई सुपर किंग्सकडून 200 सामना खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे.