PAK vs SA: दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पाकिस्तानने रचला इतिहास, 100 आंतरराष्ट्रीय T20 जिंकणारा बनला जगातील पहिला संघ

या विजयासह पाकिस्तानने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा विजय पाकिस्तानसाठी खूप स्पेशल ठरला. पाकिस्तान टी-20 क्रिकेटमध्ये विजयाचे शतक पूर्ण करणारा जगातील पहिला संघ बनला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

PAK vs SA: तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाने दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 4 विकेटने पराभूत केले. या विजयासह पाकिस्तानने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा विजय पाकिस्तानसाठी खूप स्पेशल ठरला. पाकिस्तान टी-20 क्रिकेटमध्ये विजयाचे शतक (Most T20I Wins by Team) पूर्ण करणारा जगातील पहिला संघ बनला आहे अर्थात पाकिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आपला 100वा विजय नोंदवला आहे. पाकिस्तानच्या या विशेष कामगिरीबद्दल आयसीसीने (ICC) ट्विट करत माहिती दिली. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या सामन्यात आफ्रिकी संघाने डेविड मिलरच्या (David Miller) 7 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 85 धावांच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 गडी बाद 164 धावा केल्या व विजयासाठी यजमान संघाला 165 धावांचे लक्ष्य दिले, जे या संघाने 18.4 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून गाठले. (IND vs ENG T20I 2021: भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय इंग्लंड संघ जाहीर, ‘या’ घातक खेळाडूंचे पुनरागमन)

पाकिस्तानकडून संघाचा सलामी फलंदाज मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 30 चेंडूत 42 आणि कर्णधार बाबर आझमनेही 30 चेंडूंत 44 धावांचे मोलाचे योगदान दिले. सामना खूपच रोचक वळणावर पोहोचला होता आणि पाकिस्तानने 137 धावांवर 6 विकेट्स गमावल्या पण, नंतर मोहम्मद नवाजने नाबाद 18 आणि हसन अलीने 7 चेंडूत नाबाद 20 धावा करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. टी -20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या रिझवानला तिसर्‍या सामन्यात प्लेअर ऑफ द सीरिज घोषित करण्यात आले. नवाजला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. हसन अलीने षटकारासह संघाला सामना जिंकून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने 25 धावा देत चार गडी बाद केले. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना पाकिस्तानने 3 धावांनी जिंकला तर दुसर्‍या सामन्यात यजमान संघाला 6 विकेटने पराभव पत्करावा लागला होता.

पाकिस्तानने आतापर्यंत 164 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तानने 100 सामने जिंकले आहेत तर 59 सामन्यात तो पराभूत झाला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 रेकॉर्डबद्दल बोलायचे तर त्यांनी आजवर 128 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 71 सामने जिंकले तर 55 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत भारतीय संघ पाकिस्तानच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने आजवर 137 टी-20 मध्ये 85 सामन्यात विजय तर 45 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. यानंतर तिसऱ्या स्थानावर आफ्रिकी संघाने 127 पैकी 71 सामन्यात विजय नोंदवला आहे.