IPL Auction 2025 Live

On This Day in 2007: एमएस धोनीच्या हुशारीने आजच्या दिवशी टी-20 वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर बॉल-आउटने मिळवला विजय

बॉल-आउटमध्ये भारताने पाकिस्तानला 3-0 ने पराभूत केले.

टी-20 वर्ल्ड कप सामन्यात भारताने पाकिस्तानवर बॉल-आउटने मिळवला विजय (Photo Credit: RCB Twitter)

जेव्हा जेव्हा 2007 टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) उल्लेख येतो तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या अंतिम सामन्याची आठवण येते. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात पाकिस्तानला (Pakistan) पराभूत करून टीम इंडिया (Team India) “वर्ल्ड चॅम्पियन’’ बनली. पण, वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात भारत-पाकिस्तानमध्ये आणखी एक सामना झाला होता, जो आजही अनेकांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. टी-20 च्या उद्घाटन स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. आजच्या दिवशी 13 वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान टीम साखळी सामन्यात किंग्जमेड, डरबन (Durban) येथे आमने-सामने आले जो अनिर्णित राहिला त्यामुळे सामन्याचा निर्णय बॉल-आउटने (Bowl-Out) घेतला. सामन्यात भारताने रॉबिन उथप्पाच्या (Robin Uthappa) अर्धशतकाच्या जोरावर 9 विकेट गमावून 141 धावा केल्या. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नव्हती, परंतु त्यानंतर फलंदाजांनी डाव हाताळला आणि अखेर सामना बरोबरीत आणण्यात त्यांना यश आले. अखेर बॉल-आउटमध्ये भारताने पाकिस्तानला 3-0 ने पराभूत केले. (On This Day in 1994: आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरने ठोकले करिअरमधील पहिले वनडे शतक, 79 व्या डावात 5 वर्षाची प्रतीक्षा आणली संपुष्टात)

भारतासाठी हरभजन सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पा, तर पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदी, उमर गुल, यासिर अराफत यांनी बॉल आउट खेळला. बॉल आऊटमध्ये हरभजन, सेहवाग आणि उथप्पा यांनी अचूक निशाणा साधला, पण कोणताही पाकिस्तानी गोलंदाज असे करण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि भारतीय संघाने तो सामना जिंकला. उमर गुल, यासिर अराफात आणि आफ्रिदी तीनही विकेट्स हिट करण्यास असमर्थ ठरले. दरम्यान, त्यावेळी टी-20 सामना टाय झाला तर बॉल आऊटद्वारे निर्णय होईल, असा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियम बनवला होता. मात्र, नंतर तो बदलून आता सुपर-ओव्हर खेळली जाते.

भारताकडून उथप्पा आणि धोनीने अनुक्रमे 50 आणि 33 धावांचा डाव खेळला. पाकिस्तानकडून मोहम्मद असिफने चार गडी बाद केले. भारताने दिलेल्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली होऊ शकली नाही आणि त्यांनी 87 धावांवर 5 विकेट गमावल्या. मिसबाह-उल-हकने 53 धावा केल्या, परंतु अंतिम ओव्हरमध्ये तो धावबाद झाला आणि परिणामी सामना बरोबरीत सुटला. भारताकडून इरफान पठाणने दोन गडी बाद केले. या स्पर्धे दरम्यान धोनी पहिल्यांदा भारताचे नेतृत्व करीत होता आणि अखेर 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवून दिला.