NZ vs AUS Final, ICC T20 World Cup 2021: ‘या’ तीन खेळाडूंमधील आमना-सामना ठरवेल कोण बनणार टी-20 चा जगज्जेता

विश्वचषकाचा अंतिम सामना आज, 14 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात पार पडणार आहे. झटपट क्रिकेटच्या आकडेवारीच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे पण या सामन्याचा निकाल मुख्यत्वे तीन महत्त्वाच्या खेळाडूंमधील सामन्याने लावला जाऊ शकतो.

मिचेल स्टार्क आणि डॅरिल मिशेल (Photo Credit: PT)

T20 WC 2021: आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना आज, 14 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात पार पडणार आहे. या दोन दमदार संघात यंदाच्या ट्रॉफीवर कोणाचे नाव कोरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 2015 एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील हे दोन्ही संघ होते. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडने आपल्या खेळाने खूप प्रभावित केले आहे. त्याचबरोबर आरोन फिंचच्या नेतृत्वात कांगारू संघाने अपेक्षेपेक्षा अधिक पटीने चांगली कामगिरी केली आहे. झटपट क्रिकेटच्या आकडेवारीच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे पण या सामन्याचा निकाल मुख्यत्वे तीन महत्त्वाच्या खेळाडूंमधील सामन्याने लावला जाऊ शकतो. (T20 WC फायनलपूर्वी न्यूझीलंडला जोरदार झटका, टी-20 विश्वचषक आणि भारत दौऱ्यातून प्रमुख खेळाडू पडला बाहेर)

डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) विरुद्ध मिचेल स्टार्क (Mitchell Starc)

मिशेलने उपांत्य फेरीत शानदार फलंदाजी केली. किवी संघाचा सलामीवीर तोच फॉर्म कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने एक टोक पकडून वेगवान फलंदाजीही केली. न्यूझीलंड पहिल्यांदा टी-20 विश्वचषकच्या अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा त्याची फलंदाजी हेच प्रमुख कारण ठरले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा नेता मिचेल स्टार्क मिशेलची योजना उधळण्याचा प्रयत्न करेल. डाव्या हातचा वेगवान गोलंदाज वेग आणि स्विंगचे संयोजन आहे जो न्यूझीलंडच्या शीर्ष क्रमासाठी समस्या निर्माण करू शकतो.

ट्रेंट बोल्ट (Trent Boult) विरुद्ध डेविड वॉर्नर (David Warner)

वॉर्नर आपल्या जुन्या रंगात परतताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरी सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा हा धडाकेबाज सलामीवीर उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. दुसरीकडे बोल्टने उपांत्य फेरीत एकही विकेट घेतली नाही. पण डावखुरा वेगवान गोलंदाज अंतिम फेरीत वॉर्नरला बॅकफूटवर टाकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. बोल्ट ऑस्ट्रेलियाला सलामीचा धक्का देऊ शकेल की नाही यावरही सामन्याचा निकाल अवलंबून असेल.

केन विल्यमसन (Kane Williamson) विरुद्ध अ‍ॅडम झाम्पा (Adam Zampa)

मोठे खेळाडू मोठ्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करतात. विल्यमसनसाठी ही मोठी संधी आहे. विशेषत: डेव्हॉन कॉन्वे बाहेर पडल्यानंतर विल्यमसनची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. पण ते सोपे होणार नाही. झाम्पाने यंदा वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत आणि मधल्या षटकांमध्ये तो संघाचे सर्वात महत्त्वाचे अस्त्र असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा स्थितीत विल्यमसन आणि झाम्पा यांच्यात मधल्या फलीत काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.