Motera Stadium: जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमवरील पहिल्याच लढतीसाठी भारत-इंग्लंड सज्ज, जाणून घ्या मैदानात झालेले ‘हे’ खास विक्रम
तिसरी कसोटी गुलाबी बॉल - डे-नाईट - टेस्ट असून ती नव्याने बांधलेल्या मोटेरा स्टेडियमवर होईल. या दरम्यान, आज आपण जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमची काही वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
Motera Stadium: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चेन्नईत झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad) शहरात लक्ष केंद्रित केले जात आहे. तिसरी कसोटी गुलाबी बॉल - डे-नाईट - टेस्ट असून ती नव्याने बांधलेल्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) होईल. चौथा कसोटी सामना तसेच पाच टी-20 सामन्यांची मालिका देखील याच मैदानावर खेळली जाणार आहे. सरदार पटेल स्टेडियमवर मागील महिन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआऊट फेरीचे आयोजन करण्यात आले होते मात्र, पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्यासाठी हे स्टेडियम सज्ज आहे. भारत आणि इंग्लंड संघाचे गुजरात क्रिकेट असोसिएशन (Gujarat Cricket Association) स्टेडियमवर आगमन झाले आणि दोन्ही संघांनी सामन्यापूर्वी कसून सरावाला सुरुवात केली आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना या स्टेडियमच्या भव्यतेची भुरळ पडली आहे. या दरम्यान, आज आपण जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमची काही वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 3rd Test 2021: अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठा Motera Stadium पाहून स्टुअर्ट ब्रॉड इम्प्रेस, सामन्यापूर्वी दाखवली खास झलक)
1. बसण्याची क्षमता
या स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता 1,10,000 आहे आणि हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आणि जगातील दुसरे मोठे स्टेडियम आहे. उत्तर कोरियाच्या प्योंगयांग मधील Rungrado May Day मध्ये बसण्याची क्षमता 1,14,000 इतकी आहे.
2. मोटेरा स्टेडियमची पुनर्रचना
1982 मध्ये गुजरात सरकारने साबरमती नदीच्या काठावर 100 एकर जमीन दान केल्यानंतर मोटेरा स्टेडियम अस्तित्त्वात आले. स्टेडियमचे बांधकाम नऊ महिन्यांच्या आत पूर्ण झाले आणि त्याआधी अहमदाबादच्या महानगरपालिका स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविण्यात आले. सरदार पटेल स्टेडियम म्हणून त्याच्या पुनर्बांधणीचे काम 2016 मध्ये सुरु झाले. नवीन मोटेरा स्टेडियम 63 एकरांवर पसरले असून यामध्ये एकूण तीन प्रवेश द्वार आहेत. इथे 76 कॉर्पोरेट बॉक्स असून यातील प्रत्येक बॉक्समध्ये 25 जण बसू शकतात. नवीन स्टेडियममध्ये फ्लडलाइट्स नाहीत परंतु त्याऐवजी छतावर एलईडी दिवे आहेत. वॉल्टर पी मूर यांच्याशी सल्लामसलत आणि अभियांत्रिकी फर्मद्वारे छप्पर डिझाइन केले आहेत.
3. मोटेरा स्टेडियममधील रेकॉर्ड
कसोटी रेकॉर्ड:
सर्वाधिक धावसंख्या: 16 नोव्हेंबर 2009, भारताविरुद्ध श्रीलंकेने दुसरा डाव 760-7 धावसंख्येवर घोषित केला.
सर्वात कमी धावसंख्या: 3 एप्रिल, 2008 रोजी पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताच्या 76 धावा.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याः श्रीलंकेचा माहेला जयवर्धनेने 435 चेंडूंमध्ये 275 धावा केल्या.
वनडे रेकॉर्ड
सर्वाधिक धावाः 27 फेब्रुवारी 2010, भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या 365-2 धावसंख्या
सर्वात कमी धावा: 8 ऑक्टोबर 2006, वेस्ट इंडिजविरुद्ध झिम्बाब्वेच्या 85 धावसंख्या
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याः 5 डिसेंबर 2000, भारत विरुद्ध झिम्बाब्वे दरम्यान सौरव गांगुलीच्या 152 चेंडूत 144 धावा.
4. मोटेरा स्टेडियमवरील महत्त्वाचे लँडमार्क
– सुनील गावस्करने 1986–87 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10,000 धावा पूर्ण केल्या होत्या.
– कपिल देवने कसोटीत सर रिचर्ड हॅडलीच्या 431 विकेटच्या विक्रमाला मागे टाकले होते आणि त्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले होते.
– ऑक्टोबर 1999 मध्ये सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध पहिले कसोटी दुहेरी शतक झळकावले होते.
– 2011 वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये 18,000 धावा करणारा सचिन तेंडुलकर एकमेव क्रिकेटर ठरला होता.
– 1996 मध्ये याच मैदानात भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण 51 धावा केल्या तसेच अनिल कुंबळेसह 56 धावांची भागीदारीही केली होती.
गुजरात क्रिकेट असोसिएशनने जानेवारी 2018 मध्ये नवीन आणि अत्याधुनिक व पूर्णपणे सुसज्ज स्टेडियमच्या उभारणीसाठी नवीन क्रिकेट स्टेडियमचा पायाभरणी केली. दोन वर्षांच्या अल्पावधीत पूर्ण झालेले हे स्टेडियम गुजरातच्या यशकालगीची आणखी एक वैशिष्ट्य बनत आहे.