Lasith Malinga Records: लसिथ मलिंगाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हे’ जबरदस्त रेकॉर्ड मोडणे आहे फार कठीण

आपल्या अचूक यॉर्करसाठी ओळखला जाणारा 38 वर्षीय मलिंगा 2014 टी-20 विश्वचषक विजयी श्रीलंका संघाचा कर्णधार होता. मलिंगाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने केलेले काही रेकॉर्ड पाहू, जे कोणत्याही गोलंदाजाला तोडणे किंवा साध्य करणे सोपे होणार नाही.

लसिथ मलिंगा (Photo Credit: Twitter)

श्रीलंकेचा (Sri Lanka) अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या अचूक यॉर्करसाठी ओळखला जाणारा 38 वर्षीय मलिंगा 2014 टी-20 विश्वचषक विजयी श्रीलंका संघाचा (Sri Lanka Cricket Team) कर्णधार होता. 2014 टी-20 विश्वचषक विजेत्या कर्णधार मलिंगाच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे. त्याने निवृत्तीचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. मलिंगाने यंदा जानेवारी महिन्यात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते, परंतु त्याने स्वत:ला टी -20 आंतरराष्ट्रीयसाठी उपलब्ध करून दिले होते. आता मलिंगाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने केलेले काही रेकॉर्ड पाहू, जे कोणत्याही गोलंदाजाला तोडणे किंवा साध्य करणे सोपे होणार नाही. (Lasith Malinga Retires: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने घेतली क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती; T-20 देखील खेळणार नाही)

1. त्याच्या वेगळ्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले, विशेष म्हणजे पाच हॅटट्रिक. कोणत्याही गोलंदाजाचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे हॅटट्रिक मिळवणे. पण मलिंगाने एकदा नव्हे तर पाच वेळा ही कमाल केली आहे.

2. याशिवाय मलिंगाने सलग 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम दोनदा केला आहे.

3. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा मलिंगा पहिला गोलंदाज ठरला.

4. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हॅटट्रिक घेण्याचा पराक्रमही नोंदवला आहे.

5. मलिंगाच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 122 आयपीएल सामन्यांमध्ये 170 विकेट्स घेतल्या, जी जगातील सर्वात मोठ्या टी 20 क्रिकेट लीगमधील गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 13 धावांवर पाच आहे.

6. मलिंगाने 84 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 107 विकेट, 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 338 विकेट आणि 30 कसोटी सामन्यांमध्ये 101 विकेट्स घेतल्या.

गेल्या वर्षी मलिंगाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी -20 विश्वचषकात श्रीलंकेचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु कोविड-19 मुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. राष्ट्रीय संघ आणि आयपीएल संघ मुंबई इंडियन्ससह त्याने खेळलेल्या फ्रँचायझींचे आभार मानताना मलिंगा म्हणाला, “मी पुढील वर्षांमध्ये तरुणांना मदत आणि मार्गदर्शन करण्यास उत्सुक आहे. मला टी-20 मधून पूर्ण विश्रांती हवी आहे. मी क्रिकेट खेळणार नाही पण माझे खेळावरील प्रेम कधीच संपणार नाही.”