KXIP vs SRH: निकोलस पुरनने अवघ्या 17 चेंडूत ठोकले आयपीएल 13 मधील सर्वात जलद अर्धशतक, या स्पेशल क्लबमध्ये मिळवले स्थान
पूरनने अवघ्या 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अर्धशतकी डावात 6 षटकार ठोकले. पूरनने या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले, पण आयपीएलच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक त्याचा कर्णधार केएल राहुलच्या नावावर आहे
Nicolas Pooran fastest Fifty: गुरुवारी आयपीएल 2020 च्या 22 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. सामन्यात चौकार-षटकारांचा मुसळधार पाऊस पडला आणि गोलंदाजांना धुलाई करण्यात आली. हैदराबादकडून प्रथम जॉनी बेअरस्टोने 97 धावा केल्या आणि डेविड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले. 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबच्या कॅरेबियन फलंदाज निकोलस पूरनने संघासाठी या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाने 58 धावांवर तीन मोठ्या विकेट गमावल्या होत्या. यानंतर पूरनने पदभार सांभाळला आणि जबरदस्त फलंदाजीस सुरवात केली. पूरनने अवघ्या 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अर्धशतकी डावात 6 षटकार ठोकले. या दरम्यान दुसऱ्या टोकाला उभा असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल फक्त पाहतच राहिला आणि नंतर 7 धावा केल्यावर तो धावबाद झाला. (SRH vs KXIP, IPL 2020: डेविड वॉर्नर-जॉनी बेअरस्टोची जोडी जमली! SRH फलंदाजांची विक्रमी भागीदारी; हैदराबाद कर्णधारने केली अनोख्या अर्धशतकाची नोंद)
अर्धशतकी खेळीत पूरनने युवा गोलंदाज अब्दुल समदच्या 9व्या ओव्हरला टार्गेट केले. त्याने या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सलग तीन षटकार ठोकले आणि अंतिम चेंडूवर एकही धाव आली नाही. अशाप्रकारे, या षटकात पूरनने 28 धावा काढत काही क्षणांच्या सामन्यात शानदार थरार निर्माण केला. दरम्यान, पूरनने या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले, पण आयपीएलच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक त्याचा कर्णधार केएल राहुलच्या नावावर आहे ज्याने दोन वर्षांपूर्वी अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. टॉप-5 सर्वात जलद अर्धशतकच्या यादीत राहुल पहिल्या, युसूफ पठाण (15) दुसऱ्या, सुनील नारायण (15) तिसऱ्या, सुरेश रैना (16) चौथ्या आणि पूरन पाचव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, 25 वर्षीय वेस्ट इंडीजचा यष्टिरक्षक-फलंदाज पुरानने अबू धाबीच्या मैदानावर 1 ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध 44 धावांची खेळी करत बॅटने प्रभाव पडला होता.