KXIP vs CSK, IPL 2020: फाफ डु प्लेसिस-शेन वॉटसनच्या दमदार अर्धशतकांनी मोडली CSKच्या पराभवाची मालिका, किंग्स इलेव्हन पंजाबचा 10 विकेटने दारुण पराभव

आजच्या या विजयासह सीएसकेने आयपीएलमधील यंदा पराभवाची मालिका मोडली. सीएसकेचे सलामी फलंदाज वॉटसन 83 आणि डु प्लेसिस 87 धावा करून नाबाद परतले. पंजाबच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही.

फाफ डु प्लेसिस-शेन वॉटसन (Photo Credit: PTI)

KXIP vs CSK, IPL 2020: फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)-शेन वॉटसन (Shane Watson) यांच्या अर्धशतकी डावाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) 10 विकेटने दारुण पराभव करत विजय नोंदवला. आजच्या या विजयासह सीएसकेने (CSK) आयपीएलमधील (IPL) यंदा पराभवाची मालिका मोडली. सलग तीन पराभवानंतर सीएसकेचा हा पहिला विजय ठरला. किंग्स इलेव्हनने आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करून सीएसके विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य दिले होते, जे 'येलो आर्मी' अगदी सहज गाठले. सीएसकेचा आजवर खेळलेल्या पाच सामन्यांपैकी हा दुसरा विजय ठरला. यापूर्वी आयपीएलच्या सलामी सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला होता. यानंतर त्यांना सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागले. सीएसकेचे सलामी फलंदाज वॉटसन 83 आणि डु प्लेसिस 87 धावा करून नाबाद परतले. पंजाबच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. (IPL 2020: CSK कर्णधार एमएस धोनीचं आयपीएलमध्ये अनोखं शतक, दिनेश कार्तिकनंतर 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा विकेटकीपर)

यापूर्वी, कर्णधार केएल राहुलचं धडाकेबाज अर्धशतक आणि निकोलस पूरनच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 20 ओव्हरमध्ये 178 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत वॉटसन आणि डु प्लेसिस दोघांनी तुफान फटकेबाजी करत अर्धशतके ठोकली आणि संघाला शतकी सलामी मिळवून दिली. दोन्ही सलामी फलंदाजांच्या नाबाद अर्धशतकी डावाच्या जोरावर सीएसकेने एकही विकेट न गमावता मोठा विजय नोंदवला. सीएसकेच्या विजयासह किंग्स इलेव्हनचा यंदाच्या आयपीएलमधील हा चौथा पराभव ठरला.

पंजाबच्या डावात कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवालने अर्धशतकी सलामी दिली. मयंकला चांगली सुरूवात मिळाली पण तो 26 धावांवर बाद झाला. यंदा आयपीएलमधील पहिला सामना खेळणारा मनदीप सिंह देखील चांगल्या सुरूवातीनंतर 17 धावांवर माघारी परतला. त्यानंतर पूरन आणि राहुलमी दमदार भागीदारी करून संघाचा डाव सावरला. या दोघांनी 58 धावांनी भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने यंदाचे आपले तिसरे अर्धशतक ठोकले. पण, शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलं आणि चेन्नईला सामन्यात पुनरागमन करून दिल व पंजाबला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.