Joe Root New Record: पाकिस्तानविरुद्ध जो रूटने ठोकले द्विशतक, कसोटीत सचिन-सेहवागची केली बरोबरी
या द्विशतकासह जो रुट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक द्विशतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर त्याने कसोटीत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रुटचा (Joe Root) वेग कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत त्याने कारकिर्दीतील सहावे द्विशतक झळकावले. या द्विशतकासह जो रुट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक द्विशतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर त्याने कसोटीत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. यासह त्याने सर्वाधिक द्विशतके झळकावण्याच्या बाबतीत ग्रॅमी स्मिथ, ॲलिस्टर कुक आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले आहे. रूटच्या नावावर सहा द्विशतके आहेत आणि या बाबतीत सचिन-सेहवाग व्यतिरिक्त त्याने रिकी पाँटिंग, युनूस खान, जावेद मियांदाद, केन विल्यमसन, मारवान अटापट्टू यांची बरोबरी केली आहे.
जो रूटने पूर्ण केल्या 20 हजार धावा
या खेळीच्या जोरावर रुटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा रूट हा इंग्लंडचा पहिला आणि जगातील 13वा फलंदाज आहे. इंग्लंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुक दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 15,737 धावा आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर केविन पीटरसन आहे, ज्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 13779 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: Pakistan vs England, 1st Test Day 4 Stumps Scorecard: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, हॅरी ब्रूकच्या त्रिशतकामुळे पाकिस्तान पराभवाच्या वाटेवर; विजयापासून इंग्लंड 4 विकेट्स दूर)
WTC मध्ये रूटच्या नावावर 5000 धावा
पाकिस्तानविरुद्धच्या विक्रमी खेळीच्या जोरावर रुटने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन 3904 धावांसह यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत 3486 धावा केल्या आहेत. या यादीत भारताकडून फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने येथे 2594 धावा केल्या आहेत.