IPL 2022, RCB vs SRH: सव्याज परतफेड! पराभवाचा वचपा काढत बेंगलोरकडून सनरायझर्सचा 67 धावांनी धुव्वा, डु प्लेसिस-हसरंगा चमकले

बेंगलोरच्या विजयात कर्णधार डु प्लेसिस, दिनेश कार्तिक आणि वानिंदू हसरंगा यांनी निर्णायक भूमिका बजावली. आरसीबीकडून हसरंगाने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

वानिंदू हसरंगा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, SRH vs RCB Match 54: फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 67 धावांनी धुव्वा उडवला आणि काही सामन्यापूर्वी झालेल्या पराभवाची व्याजासकट परतफेड केली. आरसीबीला (RCB) गेल्या सामन्यात 68 धावांत बाद करून हैदराबादने 9 गडी राखून विजय मिळवला होता. आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करून हैदराबादपुढे 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्सच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे हैदराबाद संघ 19.2 ओव्हरमध्ये सर्वबाद 125 धावाच करू शकला. परिणामी त्यांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. बेंगलोरच्या विजयात कर्णधार डु प्लेसिस, दिनेश कार्तिक आणि वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांनी निर्णायक भूमिका बजावली. तर सनरायझर्ससाठी राहुल त्रिपाठीचे अर्धशतकी प्रयत्न व्यर्थ ठरले. राहुलने 37 चेंडूंचा सामना करून 58 धावांचा डाव खेळला. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि दोन षटकार मारले. (IPL 2022, SRH vs RCB: पहिल्याच चेंडूवर Virat Kohli ला बाद करत सनरायझर्सच्या गोलंदाजाने केला मोठा पराक्रम, IPL मध्ये 10 वर्षांनंतर घडला असा करिष्मा)

193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने बसला जो एकही चेंडू न खेळताच धावबाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला. हैदराबाद संघाला नियमित विकेट गमावण्याची जोरदार फटका बसला. पण त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला. मार्करम 21 तर हैदराबादसाठी सलग दोन अर्धशतके करणारा निकोलस पूरन 19 धावा करून बाद झाला. तथापि राहुल त्रिपाठी तग धरून बेंगलोरच्या गोलंदाजांचा सामना करत राहिला आणि अर्धशतकी पल्ला गाठला. मोक्याच्या क्षणी त्रिपाठी बाद झाल्यावर सनरायझर्स संघात विकेट पडण्याचे सत्र सुरूच राहिले. हसरंगाने सूचित, शशांक सिंह आणि उमरान मलिक यांना जाळ्यात अडकवून संघाला विजयाच्या जवळ नेले. आरसीबीकडून हसरंगाने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर जोश हेझलवूडने दोन आणि ग्लेन मॅक्सवेलने एक गाडी बाद केला. याविजयासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही पल्लवित आहेत तर हैदराबादला तगडा झटका बसला आहे.

यापूर्वी सामन्यात टॉस जिंकून बेंगलोर संघ पहिले फलंदाजीला आला. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमात विराट तिसऱ्यांदा खातेही न उघडता बाद झाला आहे. डु प्लेसिसने अर्धशतक ठोकले. तर रजत पाटीदार 48 धावा आणि मॅक्सवेल 33 धावा करून बाद झाला. कर्णधार फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 73 धावंची नाबाद खेळी केली आणि दिनेश कार्तिक 8 चेंडूत 30 धावा करून नाबाद राहिला. बेंगलोर एका क्षणी 170 च्या पुढे जाईल असे वाटत नव्हते, पण दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 30 धावा करत धावसंख्या 190 च्या पुढे नेली. 20व्या षटकात त्याने सलग तीन षटकार ठोकले आणि संघाने 3 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली.