IPL 2022, SRH vs KKR Match 25: राहुल त्रिपाठीच्या वादळात उडाले नाईट रायडर्स, झंझावाती अर्धशतकासह मोठ्या विक्रमांना घातली गवसणी
राहुल त्रिपाठीने सनरायझर्स हैदराबादसाठी मोसमातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले, तर आयपीएल 2022 मध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा तो संयुक्तपणे दुसरा खेळाडू बनला.
IPL 2022, SRH vs KKR Match 25: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या 25 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याने शानदार खेळ दाखवला. राहुल त्रिपाठीने सनरायझर्स हैदराबादसाठी मोसमातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले, तर आयपीएल 2022 मध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा तो संयुक्तपणे दुसरा खेळाडू बनला. त्याने 21 चेंडूत आपले अर्धशतकी पल्ला गाठला. यापूर्वी पंजाब किंग्सच्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने तितक्याच चेंडूंमध्ये अर्धशतक केले आहे. तर केवळ पॅट कमिन्स याने त्यांच्यापेक्षा वेगवान ठरला आणि 14 चेंडूत आयपीएलच्या 15 व्या हंगामात अर्धशतक झळकावले. (IPL 2022, SRH vs KKR Match 25: हंगामातील सलग तिसरा विजय सनरायझर्सच्या खिशात, राहुल-मार्करम ने उडवली कोलकाता गोलंदाजांची दाणादाण)
SRH चा उजव्या हाताचा फलंदाज राहुल त्रिपाठीने 21 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह आयपीएलच्या 2022 हंगामातील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्रिपाठीने शानदार खेळ दाखवत हैदराबादचा डाव कठीण प्रसंगातून सावरला. राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने एक टोक धरले व वेगवान धावाही करून एडन मार्करमसोबत चांगली भागीदारी केली. राहुल मोक्याच्या क्षणी 37 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 71 धावा करून बाद झाला असला तरी तोपर्यंत त्याने संघाला विजयच्या जवळ नेले होते. याशिवाय 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून पदार्पण करणारा त्रिपाठी आता लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत 65 सामने खेळले आहेत आणि आयपीएलमध्ये 1500 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच मनन वोहरा (1054 धावा) आणि मनविंदर बिस्ला (798 धावा) टॉप-3 मधील इतर अनकॅप्ड खेळाडू आहेत. वोहराने 49, तर बिस्ला 39 सामने खेळले आहेत.
दरम्यान हैदराबाद आणि कोलकाताच्या सामन्याबद्दल बोलायचे तर त्रिपाठी आणि मार्करम यांच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्सने आयपीएलच्या 25 व्या सामन्यात कोलकाताचा सात गडी राखून एकतर्फी पराभव करून स्पर्धेत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. कोलकाताने 20 षटकांत 8 बाद 175 धावांचे आव्हान उभे केले, तर हैदराबादने 13 चेंडू शिल्लक असताना 3 विकेट गमावून लक्ष्य गाठले. यामुळे कोलकाताला सहा सामन्यांतील तिसरा पराभव पत्करावा लागला.