IPL 2022, RR vs LSG: नाट्यमय सामन्यात राजस्थानचा ‘रॉयल’ कमबॅक, विजयरथावर स्वार लखनऊला 3 धावांनी पाजले पराभवाचे पाणी
राजस्थानने पहिले फलंदाजी करून शिमरॉन हेटमायरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 165 धावसंख्या उभारली. कुलदीप सेनने शेवटच्या षटकात 15 धावांचा बचाव केला आणि राजस्थानच्या तीन धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केला.
IPL 2022, RR vs LSG: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 20 व्या रंगला. राजस्थानने पहिले फलंदाजी करून शिमरॉन हेटमायरच्या (Shimron Hetmyer) दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 165 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात खराब फलंदाजीनंतर खेळाडूंनी बॉलने कहर केला आणि लखनऊ संघाला 162 धावांवर रोखले. कुलदीप सेनने शेवटच्या षटकात 15 धावांचा बचाव केला आणि राजस्थानच्या तीन धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. अशाप्रकारे राजस्थानने सलग तीन विजयाचा आस्वाद घेतलेल्या केएल राहुलच्या लखनऊ संघाला फक्त 3 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान संघाच्या या ‘रॉयल’ विजयात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट याने दोन, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी एक गाडी बाद केला. दुसरीकडे, लखनऊ संघाकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि मार्कस स्टोइनिस यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. (IPL 2022, RR vs LSG Match 20: आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आऊट होणारा R Ashwin पहिला, जाणून घ्या संघासाठी घेलेल्या या निर्णयामागील कारण)
166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात कर्णधार केएल राहुल आणि के गौतम यांना बोल्टने माघारी धाडलं. त्यानंतर क्रमवारीत बढती मिळालेला जेसन होल्डर देखील स्वस्तात बाद झाला. दीपक हुडा याने काही चौकार खेचून राजस्थान गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तथापि तो देखील अधिक काळ खेळपट्टीवर तळ ठोकू खेळू शकला नाही आणि 25 धावा करून आऊट झाला. यानंतर गेल्या काही सामन्यांमध्ये संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा आयुष बडोनीने देखील गुडघे टेकले. कृणाल पांड्याने डी कॉकच्या साथीने संथ धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान संघाला मोठा धक्का बसला आणि चहलने तिसर्याच षटकात डी कॉक आणि क्रुणाल पांड्या यांना बाद करून लखनऊला मोठा धक्का दिला. लखनऊ संघाला अखेरच्या षटकांत 15 धावांची गरज होती आणि रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नवोदित कुलदीप सेनकडे चेंडू सोपवला. सेनच्या पहिल्या बॉलवर आवेश खानने एक धाव घेऊन स्टोइनिसला फलंदाजी दिली, पण पुढील तीन चेंडूत धाकड अष्टपैलू एकही धाव घेऊ शकला नाही. तर पुढील दोन बॉलवर स्टोइनिसने एक चौकार व षटकार खेचला आणि राजस्थानने तीन धावांनी नाट्यमय सामना जिंकला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 165 धावा केल्या. राजस्थानकडून हेटमायरने 36 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्सने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट विकेट गमावल्या आणि एकावेळी त्यांची अवस्था 67/4 अशी झाली. पण हेटमायरने अश्विन आणि रियान पराग यांच्यासाथीने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. हेटमायरच्या खेळीमुळे राजस्थानने शेवटच्या पाच षटकांत 73 धावा काढल्या. लखनऊकडून कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डरने प्रत्येकी दोन बळी घेतले.