IPL 2022: विराट कोहलीनंतर मनीष पांडे बनणार RCB चा कर्णधार? या 3 कारणांमुळे बेंगलोर फ्रँचायझी करू शकते मोठा फेरबदल
विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीला आता नव्या कर्णधाराची गरज आहे. सनरायझर्स हैदराबादने जाहीर केलेल्या नव्या चेहऱ्यांमध्ये मनीष पांडेचे नाव चर्चेत आहे. याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.
IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या लिलावाची जोरदार चर्चा रंगली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएल 2021 नंतर कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट आता फक्त आरसीबीमध्ये खेळाडू म्हणून दिसणार आहे. विराट 7 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात फ्रँचायझीने आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. विराटने 2013 मध्ये आरसीबीचे (RCB) कर्णधारपद सांभाळले होते. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीला आता नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे. कोहलीशिवाय फक्त ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना कायम ठेवण्यात आले आहे. यापैकी मॅक्सवेलचे पारडे अनुभवाने जड आहे. पण सनरायझर्स हैदराबादने जाहीर केलेल्या नव्या चेहऱ्यांमध्ये मनीष पांडेचे नाव चर्चेत आहे. (IPL 2022 Costliest Player: एमएस धोनी-विराट कोहली नव्हे, रिटेन्शन शर्यतीत ट्रिपल 'R'चा दबदबा... आयपीएल लिलावापूर्वी ‘हे’ ठरले सर्वात महागडे खेळाडू)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसीबी मेगा लिलावादरम्यान (IPL Mega Auction) मनीष पांडेवर मोठी बोली लावून ताफ्यात सामील केले जाऊ शकते. याशिवाय त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1. आरसीबी आणि मनीष पांडेची जोडी
मनीष पांडे आरसीबी कॅम्पसाठी नवीन चेहरा नाही. यापूर्वी 2009 मध्ये तो या फ्रँचायझीचा भाग होता. या वेळी त्याने शानदार शतकही ठोकले आणि हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. याशिवाय देवदत्त पडिक्कलला RCB ने रिलीज केल्याने पांडेच्या समावेशाने टॉप ऑर्डरवरील समस्या दूर होऊ शकतात.
2. मनीष पांडे स्थानिक कर्णधाराच्या ट्रेंडमध्ये फिट
पांडे कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आणि याचा फायदा आरसीबी घेऊ शकते. प्रत्येक संघाला 14 सामन्यांपैकी 7 सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत खेळपट्टी आणि परिस्थितीचे चांगले ज्ञान संघासाठी फायदेशीर ठरू शकते, जे मनीषकडे आहे. रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवून मुंबई इंडियनने हा ट्रेंड फार पूर्वीपासून सुरू केला आहे. अलीकडेच दिल्लीने कर्णधारपदाची कमान रिषभ पंतकडे सोपवली आहे.
3. कर्नाटकला दोनदा बनवले मुश्ताक अली ट्रॉफी चॅम्पियन
पांडेकडे नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेंगलोरचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वात दोनदा कर्नाटक संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने 2018-19 स्पर्धेत महाराष्ट्राचा आणि 2019-20 मध्ये तामिळनाडूचा पराभव केला. या वर्षीही, मुश्ताक अली स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली बेंगलोर उपविजेता ठरला.