MI-CSK (Photo Credit - FB)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात मोठे उलटफेर झालेले पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants), या दोन नवीन संघांनी यावर्षी आयपीएलच्या प्लेऑफची स्पर्धा रंगतदार बनवली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. गुजरात टायटन्स पॉईंट टेबलमध्ये आघाडीवर आहे तर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपद जिंकणारे दोन संघ तळाशी बसलेले आहेत. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघांनी आतापर्यंत आयपीएलचे सर्वाधिक किताब जिंकलेले आहेत. मुंबई विक्रमी पाच वेळा चॅम्पियन बनली आहे तर चेन्नईचे गेल्या वर्षी विजयाचा चौकार लगावला.या दोन्ही संघाची स्थिती गुणतालिकेत अत्यंत खराब असून सध्या तळाशी विराजमान आहेत. (IPL 2022 Points Table Updated: दिल्लीला पराभवाचा धक्का तर विजयासह लखनऊ - RCB ची पॉईंट टेबलमध्ये गरुड झेप; मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात)

लक्षणीय आहे की 2010 ते 2021 पर्यंत या दोन संघानी सर्वाधिक वेळा आयपीएल विजेता गौरव मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यापैकी सीएसकेने चार मॅच गमावल्या तर एक खेळ खिशात घातला आहे. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध अष्टपैलू खेळीने संघाने पहिल्या विजयाचा नारळ फोडला होता. अशा परिस्थितीत यंदाच्या आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी चेन्नईला सर्वतोपरीने खेळून मोठ्या फरकाने उर्वरित सामने जिंकणे गरजेचे आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये विजेतेपद काबीज केले आहे.

दुसरीकडे, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सची हालत आणखी वाईट आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत आयपीएलचे पाच विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबईने खेळलेले सर्व सहा सामने गमावले असून त्यांचा नेट रनरेट -1.048 आहे. मुंबई 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींवर गुणतालिकेत मोठी नामुष्की ओढवली आहे.