IPL 2022, MI vs RCB: मुंबईविरुद्ध बेंगलोरच्या ताफ्यात होणार स्फोटक अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन, पहा आरसीबी कोणाला बेंचवर बसवणार
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करू शकतो. आजचा सामनाही जिंकण्यासाठी आरसीबी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
IPL 2022, MI vs RCB: आयपीएल (IPL) 2022 चा थरार शिगेला पोहोचला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) या मोसमात सर्वच संघ एकमेकांशी स्पर्धा करून जिंकण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. या मोसमातील 18वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात MCA स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून होणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी (RCB) आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करू शकतो. आजचा सामनाही जिंकण्यासाठी आरसीबी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आणि त्यासाठी आरसीबीच्या संघात ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. मॅक्सवेल संघात असल्याने आरसीबीची फलंदाजी अधिक मजबूत होईलच तर मॅक्सवेल पार्ट-टाइम गोलंदाज म्हणूनही संघात योगदान देऊ शकतो. (IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्स सावधान; बेंगलोरचा ‘हा’ तडाखेबाज गोलंदाज गेल्या दोन सामन्यात दिग्गज खेळाडूंना एकटा पुरून उरला आहे!)
बेंगलोरचा संघात कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत यांची सलामी जोडी सध्या चांगल्या लयीत आहे, तर आता मधल्या फळीत स्टार फलंदाज मॅक्सवेलच्या पुनरागमनामुळे आणखी मजबूत होणार आहे. विराट कोहलीही मोठी खेळी खेळण्यासाठी उत्सुक असेल. मॅक्सवेलला संघात सामील करणे म्हणजे शेरफेन रदरफोर्ड, वानिंदू हसरंगा आणि डेविड विली यांच्यापैकी एकाला बेंचवर बसवणे बेंगलोरला भाग पडणार आहे. मॅक्सवेलने गेल्या हंगामात आरसीबीच्या प्लेऑफ फेरी गाठण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे यावेळी लिलावापूर्वी राखून ठेवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूकडून आरसीबीला पुन्हा तशाच स्फोटकी खेळीची अपेक्षा असेल. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत, कारण आज भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात पाचवेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले तर रोहितच्या संघाला अद्याप खातेही उघडता आलेले नाही. गेल्या तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पॉइंट टेबलमध्ये मुंबई 9व्या क्रमांकावर विराजमान आहे. दुसरीकडे, आरसीबीबद्दल बोलायचे झाले तर संघ 3 पैकी 2 सामने जंकून गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर बसला आहे. त्यांनी आतापर्यंत एक सामना गमावला आहे.