IPL 2022, MI vs LSG: मुंबई इंडियन्सचे पराभवाचेच पाढे, चुरशीच्या सामन्यात लखनौने मारला विजयाचा चौकार
IPL 2022, MI vs LSG: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा आपला सहावा सामना देखील गमावला आणि पराभवाची मालिका सुरूच ठेवली आहे. लखनौने प्रथम फलंदाजी करून मुंबईपुढे 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण पाच वेळा आयपीएल चॅम्पियन संघाला हे आव्हान पेलले नाही आणि 18 धावांनी सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला.
IPL 2022, MI vs LSG: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धचा आपला सहावा सामना देखील गमावला आणि पराभवाची मालिका सुरूच ठेवली आहे. लखनौने प्रथम फलंदाजी करून मुंबईपुढे 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन संघाला हे आव्हान पेलले नाही आणि निर्धारित 20 षटकांत 181 धावाच करू शकला आणि 18 धावांनी सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 36 धावा केल्या. तर डेवाल्ड ब्रेविस 31 आणि तिलक वर्माने 26 धावांचे छोटेखानी योगदान दिले. अशाप्रकारे लखनौने सहापैकी चौथा सामना जिंकला तर मुंबई आतापर्यंत आपले खाते उघडण्यात अपयशी ठरली. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) लखनौच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आवेशने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच जेसन होल्डर, रवी बिष्णोई आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबईच्या गोलंदाजांवर बरसला KL Rahul, यंदा रोहितच्या ‘पलटन’ विरुद्ध शतक करणारा बनला दुसरा)
लखनौने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 6 धावा करून परतला. पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ब्रेविसने मोर्चा सांभाळला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करून लखनौच्या गोलंदाजांना घाम फोडला. पण पॉवरप्लेच्या आवेश खानच्या अंतिम षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ब्रेविस बाद झाला. ब्रेविसने 13 चेंडूत 31 धावांची जलद खेळी खेळली. त्यानंतर मुंबईचा महागडा ठरलेला ईशान किशन देखील प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आणि 17 चेंडूत 13 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तीन विकेट झटपट पडल्यावर सूर्या आणि तिलक यांनी धावफलक ठेवला. दोंघांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या पहिल्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. पण जेसन होल्डरने वर्माला क्लीन बोल्ड करून मुंबईची चौथ्या विकेटसाठीची 64 धावांची भागीदारी मोडली. वर्मा पाठोपाठ सूर्यकुमार देखील माघारी परतला. फॅबियन एलन देखील बॅटने फारसे योगदान देऊ शकला नाही. पोलार्ड आणि जयदेव उनाडकट यांनी मोठे फटके खेळून विजय मिळवण्याचा अपयशी प्रयत्न केला. उनाडकटने 6 बॉलमध्ये 14 धावा केल्या. मुरुगन अश्विन दोन चेंडूत 6 धावा आणि पोलार्ड 13 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. मुंबईने डावातील अखेरच्या षटकांत तीन विकेट गमावल्या.
यापूर्वी टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या लखनौने कर्णधार केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर 199 धावांपर्यंत मजल मारली. राहुल आणि क्विंटन डी कॉकने अर्धशतकी भागीदारी करून संघाला वेगवान सुरुवात करून दिली. पण वैयक्तिक 24 धावसंख्येवर डी कॉकला बाद करून मुंबईला पहिले यश फॅबियन एलनने मिळवून दिले. यानंतर मनीष पांडेने 38 धावा करून कर्णधाराला चांगली साथ दिली. केएल राहुलने नाबाद 103 धावांच्या शानदार खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार मारले. राहुलचे या मोसमातील हे पहिले, मुंबईविरुद्ध दुसरे आणि आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले. मुंबईकडून जयदेव उनाडकटने 2 बळी घेतले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)