IPL 2022: प्लेऑफच्या शर्यतीत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका, उर्वरित सामन्यांमधून माजी कर्णधार रवींद्र जडेजा होऊ शकतो बाहेर
चेन्नई सुपर किंग्जच्या अष्टपैलू खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात शरीराच्या वरच्या भागात दुखापत झाली होती ज्यातून तो अजूनही सावरू शकलेला नाही. त्यामुळे सीएसकेच्या मोहिमेचा शेवट होईपर्यंत जडेजा मैदानात परतण्यास फिट होईल असे वाटत नाही.
Ravindra Jadeja IPL 2022: प्लेऑफ पात्रतेच्या अशांवर टांगती तलवार असताना, चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे कारण रवींद्र जडेजा दुखापतीमुळे (Ravindra Jadeja Injury) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या उर्वरित हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार जडेजासाठी आयपीएलचा (IPL) 2022 हंगाम खराब ठरला आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर अष्टपैलूच्या शरीराच्या वरच्या भागाला झालेल्या दुखापतीमुळे आता त्याच्यावर आयपीएलच्या उर्वरित सामन्यातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. आरसीबीविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना अष्टपैलू खेळाडूला त्याच्या शरीराच्या वरच्या भागावर मार लागला. त्यावेळी मैदानात त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसत होते आणि त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईच्या सामन्यातुनही बाहेर बसला होता. सीएसके कॅम्पने आता परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे आणि असे दिसते की जडेजाची प्रकृती सुधारत नाही. (IPL 2022, CSK vs DC: मोईन अलीच्या फिरकीसमोर दिल्लीची दाणादाण; चेन्नई सुपर किंग्सचा 91 धावांनी मोठा विजय)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सीएसके व्यवस्थापन उर्वरित खेळांसाठी जडेजाबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. अशापरीस्थितीत आयपीएल प्लेऑफ शर्यतीच्या शेवटी जडेजाची अकाली दुखापत हा CSK साठी मोठा धक्का ठरू शकते. एमएस धोनीच्या नेतृत्वातील ‘सुपर किंग्स’ संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघ आता ‘करो किंवा मरो’च्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरेल. दरम्यान, जडेजाने या मोसमात 10 सामने खेळले आणि 118.37 च्या कमी स्ट्राइक रेटने फक्त 116 धावा केल्या आहेत. सीएसकेचा माजी कर्णधारही चेंडूने देखील सातत्य दाखवण्यात अपयशी ठरला आहे. त्याने 49.60 च्या सरासरीने फक्त पाच विकेट्स घेतल्या आहेत. प्रकरण सर्वात वाईट म्हणजे त्याने बरेच सोपे झेल देखील सोडले आहेत आणि मैदानात तो जुन्यासारखा चपळ दिसला नाही. त्यामुळे खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये त्याचा निराशाजनक फॉर्म आयपीएल 2022 मधील CSK च्या खराब कामगिरीमागील एक मुख्य कारण आहे. याशिवाय कर्णधारपदाचा जडेजाच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि त्यामुळेच त्याने मध्यावर जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला.
या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी जडेजाला CSK चे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते परंतु फ्रँचायझीच्या खराब निकालामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर एमएस धोनीने पुन्हा संघाची कमान हाती घेतली. तसेच धोनीने पदभार सांभाळल्यापासून चेन्नईच्या निकालात सुधारणा झाली असली, तरी पहिल्या चारमध्ये स्थान मिळवणे अजूनही एक कठीण काम आहे. CSK ने लीग मोहिमेतील त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकले तरी त्यांचे 14 गुण होतील. तर लीगच्या या टप्प्यावर एकूण 4 फ्रँचायझींचे आधीच 14 किंवा त्याहून अधिक गुण आहेत. त्यामुळे सीएसकेचे प्लेऑफ खेळणे हे अन्य संघाच्या कामगिरीवरही अवलंबून असेल.