IPL 2022, CSK vs GT: गुजरात अव्वल नंबर! चेन्नईचा 7 विकेट्सने दारुण पराभव करत नंबर 1 सिंहासनावर टायटन्स ‘राज’ कायम

गुजरातने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला 134 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात रिद्धिमान साहाच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या बळावर 7 विकेट्सने सुपर किंग्सचा दारुण पराभव केला आणि आयपीएल 2022 च्या पॉईंट टेबलवर पहिल्या क्रमांकावर मजबूत ताबा मिळवला आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाचा विजयरथ सुसाट धावत आहे. गुजरातने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला 134 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात रिद्धिमान साहाच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या बळावर 19.1 ओव्हरमध्ये 7 विकेट्सने सुपर किंग्सचा दारुण पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 च्या पॉईंट टेबलवर पहिल्या क्रमांकावर मजबूत ताबा मिळवला आहे. गुजरातने आता 13 पैकी 10 सामने जिंकले असून त्यांचे 20 गुण आहेत. तर एमएस धोनीच्या सुपर किंग्सला 9 व्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईसाठी मथीशा पाथिरानाने दोन आणि मोईन अलीने 1 गडी बाद केला. पण छोट्या धावसंख्येचा बचाव करण्यात धोनी ब्रिगेडच्या पदरी अपयश आले.

ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसके संघाने 20 ओव्हरमध्ये 5 बाद 133 धावा केल्या. गुजरातसाठी माफक धावसंख्येचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रिद्धिमान साहाच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी करून टीमल जोरदार सुरुवात करून दिली. साहाने आक्रमक पवित्रा घेतला तर गिलच्या खेळीचा वेग मंदावलेला दिसला. यादरम्यान आयपीएल पदार्पण केलेल्या ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पाथिरानाने गुजरातला पहिला धक्का देत शुभमन गिलला पायचीत बाद केले. यानंतर साहाने वेडच्या साथीने संघाचा धावफलक हलता ठेवला. मोईन अलीने वेडला जाळ्यात अडकवून झेलबाद केले. कर्णधार हार्दिक पांड्या देखील स्वस्तात तंबूत परतला. पण एका बाजूने तग धरून खेळणाऱ्या साहाला डेविड मिलरची उपयुक्त साथ मिळाली आणि दोघांनी रोमहर्षक सामन्यात गुजरातला विजयीरेष ओलांडून दिली. रिद्धिमान साहा 67 आणि डेविड मिलर 15 धावा करून नाबाद परतला.

या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली केली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 53, एन जगदीसनने नाबाद 39, मोईन अलीने 21 आणि कर्णधार धोनीने 7 धावा केल्या. दुसरीकडे, गुजरातकडून मोहम्मद शमीने दोन तर राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.