IPL 2021: मुंबईविरुद्ध तिसर्‍या पराभवानंतर ‘या’ दिग्गज भारतीयचा SRH संघात समावेश करण्याची मागणी, लिलावात 2 कोटीमध्ये केले खरेदी

चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने शानदार गोलंदाजी करत 151 धावांच्या लक्ष्याचा बचाव केला, ज्यामुळे हैदराबादला पराभव पत्करावा लागला. यानंतर, टीम मॅनेजमेंटबद्दल यूजर्स चांगलेच नाराज आहेत आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये मधल्या फळीतील अष्टपैलू केदार जाधवला समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. 

केदार जाधव (Photo Credits: Instagram)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा नववा सामना काल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने शानदार गोलंदाजी करत 151 धावांच्या लक्ष्याचा बचाव केला, ज्यामुळे हैदराबादला 13 धावांनी या मैदानावर सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो बाद झाल्यानंतर संपूर्ण संघ पुन्हा पत्त्यांसारखा विखुरला. यंदाच्या मोसमात हैदराबादच्या सलग तिसर्‍या पराभवानंतर सोशल मीडियावर टीम मॅनेजमेंटबद्दल यूजर्स चांगलेच नाराज आहेत आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये मधल्या फळीतील अष्टपैलू केदार जाधवला (Kedar Jadhav) समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) यापूर्वी खेळलेल्या केदारला हैदराबादने लिलावात त्याच्या 2 कोटींच्या बेस प्राईसवर खरेदी केले होते. (MI vs SRH IPL 2021 Match 9: मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवर परतली, ‘हे’ 3 ठरले गेम चेंजर)

क्रिकेट चाहत्यांव्यतिरिक्त माजी भारतीय खेळाडू प्रग्यान ओझाने देखील जाधवचा सनरायझर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. संघाचा मध्यमक्रम त्यांची दुर्बळता सिद्ध होत आहे. ओझाच्या म्हणण्यानुसार जाधव चेन्नई सुपर किंग्जकडून एमए चिदंबरम स्टेडियमवर बरेच सामने खेळला होता, अशा परिस्थितीत त्याला या मैदानावर खेळायचा खूप अनुभव आहे. जाधवला हैदराबाद संघात संधी मिळाली तर ते मधल्या फळीतील समस्या सोडवू शकतात. केदार जाधवच्या आतापर्यंतच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने आजवर देशाच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत 87 सामन्यात 22.8 च्या सरासरीने 1141 धावा केल्या आहेत यादरम्यान त्याने चार अर्धशतके देखील ठोकली आहेत. इतकंच नाही तर केदार गोलंदाजीने देखील विरोधी संघावर दबाव निर्माण करून गरज असताना संघासाठी विकेट काढू शकतो.

दरम्यान, केदारला संघासाठी तिसऱ्या स्थानावर येणाऱ्या मनीष पांडेच्या जागी संधी देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात सनरायझर्सकडून सलामीच्या सामन्यात 61 धावांची नाबाद खेळी करणारा मनीष पांडे तिसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. शिवाय, पांडे मागील दोन्ही सामन्यात खराब फटका खेळत तंबुत परतला आहे.