IPL 2020: 'सुपर संडे' स्पेशल! आयपीएल स्पर्धेत एकाच दिवशी 3 Super Over, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा एकाच सामन्यात खेळण्यात आल्या 2 सुपर ओव्हर

एकाच दिवशी दोन सामन्यांना निकाल सुपर ओव्हरने लागण्याचा आणि पहिली सुपर ओव्हर अनिर्णित राहण्याची आयपीएलच्या इतिहासातली ही पहिली वेळ ठरली आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यातील आयपीएल (IPL) 2020चा आजचा सामना चाहत्यांना चांगलाच लक्षात राहील. दुबई येथे खेळण्यात आलेल्या रंगतदार सामन्यात किंग्स इलेव्हनने बाजी मारली. सामना बरोबरीत सुटल्याने एक नाही तर दोन सुपर ओव्हर खेळण्यात अली. 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या आयपीएलचे डबल-हेडर सामने चाहत्यांसाठी खरोखर 'सुपर संडे' स्पेशल ठरले कारण त्यांना एक नाही तरी तीन सुपर ओव्हर सामन्यांचा थरार अनुभवायला मिळाला. एकाच दिवशी दोन सामन्यांना निकाल सुपर ओव्हरने लागण्याचा आणि पहिली सुपर ओव्हर अनिर्णित राहण्याची आयपीएलच्या इतिहासातली ही पहिली वेळ ठरली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई आणि पंजाबपूर्वी सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामन्याचा निकालही सुपर ओव्हरमध्ये लागला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवशी दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाले आहेत. (MI vs KXIP, IPL 2020: किंग्स इलेव्हनने रोखला मुंबईचा विजयरथ, 'सुपर' विजय मिळवत दिला पराभवाचा दणका)

इतकंच नाही तर हा चौथा सुपर ओव्हर सामना ठरला. यापूर्वी, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि केकेआर व अखेर मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हनमध्ये यंदा सुपर ओव्हर सामने खेळले गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबई दोनही यंदा दोन सुपर ओव्हर सामन्यात पराभव झाला आहे. एका हंगामात दोन सुपर ओव्हर सामने गमावलेला मुंबई इंडियन्स पहिली टीम ठरली.दरम्यान, आजच्या सामन्यात विजय मिळवून किंग्स इलेव्हनने 2 गुण मिळवत गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहचले तर मुंबई इंडियन्स 12 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.

मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हनकडून कर्णधार राहुलने 77 धावांचा दमदार डाव खेळला, पण पंजाबने अखेरच्या चेंडूवर हाराकिरी केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 9 धावा केल्या त्यानंतर अखेरीस मुंबईने फलंदाजी करून 11 धावा केल्या आणि पंजाबसाठी क्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत गेलने धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयंक अग्रवालने गेलच्या पावलावर पाऊल टाकून पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यासह मुंबईला सलग पाच विजयानंतर पराभवाचा धक्का बसला.