IPL 2020: आयपीएल दे दणादण! 13व्या हंगामात कोणत्या 10 खेळाडूंनी ठोकले सर्वात मोठे षटकार, जाणून घ्या
आयपीएल 13 मधील 39व्या सामन्यानंतर सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कॅरेबियन खेळाडू निकोलस पूरन आघाडीवर आहे. पूरनने आजवर आयपीएल 2020मध्ये 22 षटकार ठोकले आहेत.
Longest Sixes in IPL 2020 So Far: कोरोनाव्हायरस आजारामुळे या वेळी इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13 वा मोसम भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) खेळला जात आहे. आयपीएलच्या (IPL) 13व्या हंगातील प्ले-ऑफची लढत अजून मनोरंजक झाली आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत आहे. आयपीएल 13 मधील 39व्या सामन्यानंतर सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कॅरेबियन खेळाडू निकोलस पूरन (Nicholas Pooran) आघाडीवर आहे. पूरनने आजवर आयपीएल 2020मध्ये 22 षटकार ठोकले आहेत. या व्यतिरिक्त या हंगामातील सर्वात लांब शषटकाराची नोंदही निकोलस पूरनच्या नावावर आहेत. या हंगामात त्याने आतापर्यंत 106 मीटर मोठा षटकार मारला आहे. पूरननंतर इंग्लंडच्या अष्टपैलू जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) या हंगामातील दुसर्या सर्वाधिक लांब षटकार मारला आहे. (CSK Playoff Chances: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडे अजूनही प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी? वाचा सविस्तर)
आर्चरने 105 मीटर लांब 6 षटकार मारले आहेत. आर्चरनंतर निकोलस पूरन पुन्हा तिसऱ्या स्थानावर आहे. यंदा त्याने 105 मीटर लांबीचा षटकार ठोकला आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन 102, पाचव्या क्रमांकावर एम एस धोनी 102, सहाव्या क्रमांकावर शेन वॉटसन 101, सातव्या क्रमांकावर आरोन फिंच 100, निकोलस पूरन 100 लांब षटकारासह 8व्या क्रमांकावर, नवव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर 99 आणि दहाव्या क्रमांकावर बसलेल्या क्रिस गेलने 99 मीटर लांबीचा षटकार मारला आहे.
दुसरीकडे, आयपीएल 2020 मध्ये 39 सामन्यांनंतर निकोलस पूरनने आतापर्यंत सर्वाधिक 22 षटकार ठोकले आहेत. एबी डिव्हिलिअर्स, केएल राहुल आणि सजू सॅमसन यांनी प्रत्येकी 19 षटकार ठोकले आहेत. या खेळाडूंच्या व्यतिरिक्त केरॉन पोलार्डने 17, राहुल तेवतियाने 16, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल आणि इयन मॉर्गन यांनी अनुक्रमे 15 षटकार ठोकले आहेत. दरम्यान, आयपीएलच्या एका हंगामात सर्वात मोठा षटकार मारण्याचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या अॅल्बी मॉर्केलच्या नावावर आहे, पण लीगच्या चालू आवृत्तीतील अनेक फलंदाजांनी 13 वर्षाच्या ऐतिहासिक मास्टरस्ट्रोकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएल 2008 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू मॉर्केलने डेक्कन चार्जर्सचा फिरकीपटू प्रग्यान ओझाला टार्गेट करत 125मी लांबीचा षटकार ठोकत विक्रमाची नोंद केली जो अद्यापही अबाधित आहे.