India’s Predicted XI For 2nd Test Vs England: भारतीय संघ इंग्लंडला देणार टक्कर; दुसऱ्या कसोटी सामन्यात 'या' 11 खेळाडूंसोबत मैदानात उतरण्याची शक्यता

चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला 227 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध (IND Vs END) पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला 227 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशा पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी बजावून दाखवेल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाला टक्कर देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तसेच यासाठी भारतीय संघाला किमान एकमेव बदल करणे अपेक्षित आहे. पहिल्या कसोटी सामन्यात छाप सोडण्यास अपयशी ठरलेला शाहबाज नदीम याच्या जागेवर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

अक्षर पटेलला मालिकेतील पहिल्या कसोटीसाठीच संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, नाणेफेकीपूर्वी सरावादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने नदीमचा अंतिम 11 खेळाडूंत समावेश करण्यात आला. परंतु, नदीम छाप पाडण्यात अपयशी ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षर पटेल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी डावखुरा फिरकीपटू शाहबाझ नदीमऐवजी अक्षरचे भारतीय संघातील स्थान पक्के मानले जात आहे. हे देखील वाचा- Ravindra Jadeja Injury Update: इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी रविंद्र जडेजा तंदुरुस्त नाही, टीम इंडियाला मोठा झटका

इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ-

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर आश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीस बुमराह

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघ सुरुवातीला डगमगताना दिसला. मात्र, एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी करून दाखवली आणि टी-20 सह कसोटी मालिकाही खिश्यात घातली. आता इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही भारतीय संघ अशीच कामगिरी करून दाखवेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.