Vaibhav Suryavanshi Score in IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीचे वादळी फलंदाजी; अवघ्या 22 चेंडूत ठोकल्या 44 धावा, अर्धशतक हुकले, Video

श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिकोणीय अ-मालिका २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अफगाणिस्तान अ विरुद्ध अवघ्या २२ चेंडूत ४४ धावांची धडाकेबाज खेळी केली.

श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या त्रिकोणीय एकदिवसीय 'अ' मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दाम्बुला येथील रंगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अफगाणिस्तान अ विरुद्ध खेळताना वैभवने अवघ्या २२ चेंडूत ४४ धावांची वादळी खेळी केली. पहिल्या सामन्यातील सुमार कामगिरीनंतर या सामन्यात त्याने भारतीय संघाला अत्यंत स्फोटक आणि मजबूत सुरुवात करून दिली. मात्र, अवघ्या ६ धावांनी त्याचे शानदार अर्धशतक हुकले.

अवघ्या २२ चेंडूत ९ चौकारांचा पाऊस

अफगाणिस्तान अ संघाने टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशीने पहिल्या ओव्हरपासूनच अफगाण गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने मैदानाच्या चोहोबाजूंनी सुरेख फटकेबाजी करत अवघ्या २२ चेंडूंच्या खेळीत ९ उत्कृष्ट चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट हा २०० च्या वर होता. त्याने सहकारी सलामीवीर प्रभसिमरन सिंगसोबत अवघ्या ५ ओव्हरमध्ये भारताचे अर्धशतक फलकावर लावले आणि पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची मजबूत भागीदारी रचली.

अप्पर कट मारण्याच्या नादात विकेट गमावली

आपल्या अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचलेला वैभव ८ व्या ओव्हरमध्ये बाद झाला. अफगाणिस्तानचा गोलंदाज अब्दुल्ला अहमदजई याने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर वैभवने अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू थेट यष्टीरक्षक इशाक रहिमीच्या हातात गेला. झेलबाद झाल्यामुळे वैभवला ४४ धावांवर माघारी परतावे लागे. अहमदजईने ही मोठी विकेट घेत भारताची पहिली जोडी फोडली. बाद झाल्यानंतर अर्धशतक चुकल्यामुळे वैभव चांगलाच निराश दिसला.

मालिकेतील पार्श्वभूमी

या त्रिकोणीय मालिकेत भारताची ही दुसरी लढत आहे. याआधी खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंका अ संघाचा ८ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली होती. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशी केवळ १४ धावा करून बाद झाला होता. मात्र, आजच्या सामन्यात त्याने आपली जुनी कसर भरून काढत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेणारा भक्कम पाया रचून दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement