IND W vs ENG W Test 2021: ब्रिस्टल कसोटीत Shafali Verma चे पदार्पण, मैदानात पाऊल ठेवताच रचला इतिहास, वाचा सविस्तर

इंग्लंडविरुद्ध सामन्यात पदार्पणासोबत शेफालीने इतिहास रचला आणि भारताकडून सर्वात कमी वयात टेस्ट डेब्यू करणारी तिसरी महिला क्रिकेटर ठरली. शेफाली वर्माला 17 वर्ष 139 दिवसांत कसोटी खेळण्याची संधी मिळाली.

शेफाली वर्मा टेस्ट डेब्यू (Photo Credit: Twitter/BCCI)

Youngest Women Test Debutant: इंग्लंड (England) महिला संघाची कर्णधार हेदर नाइटने (Heather Knight) टॉस जिंकून भारताला पहिले गोलंदाजी करण्यास सांगितले. ब्रिटिश संघाने सोफिया डन्कलीला पदार्पणाची संधी दिली आहे तर टीम इंडियासाठी (Team India) 17 वर्षीय शेफाली वर्माने (Shafali Verma) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. महिला संघ 7 वर्षांनंतर कसोटी खेळणार आहे. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत धमाल खेळी करणारी शेफाली वर्मा आता कसोटीत देखील तिच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छित असेल. इंग्लंडविरुद्ध सामन्यात पदार्पणासोबत शेफालीने इतिहास रचला आणि भारताकडून सर्वात कमी वयात टेस्ट डेब्यू करणारी तिसरी महिला क्रिकेटर ठरली. शेफाली वर्माला 17 वर्ष 139 दिवसांत कसोटी खेळण्याची संधी मिळाली. (IND W vs ENG W Test 2021: ब्रिटीश कर्णधार Heather Knight ने जिंकला टॉस; टीम इंडिया करणार पहिले बॉलिंग, 17 वर्षीय Shafali Verma चे कसोटीत पदार्पण)

भारताकडून कसोटी खेळणारी ती तिसरी सर्वात कमी वयाची महिला खेळाडू ठरली असून तिच्यापूर्वी रजनी वेणुगोपालने 15 वर्षे 283 दिवस तर सुलक्षणा कुलकर्णीने 17 वर्ष 104 दिवसांत कसोटी पदार्पण केले होते. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत शेफालीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघाने फायनल सामन्यात प्रवेश केला होता पण यजमान संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. शेफालीच्या टी-20 कामगिरीबद्दल बोलायचे तर या छोट्या फॉरमॅटमध्ये शानदार खेळी केली आहे. तिने 22 सामन्यात 29 च्या सरासरीने 617 धावा केल्या आहेत ज्यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. 73 धावा ही तिची वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या आहे तर या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट 148 आहे.

दरम्यान, भारतीय महिला संघाने शेवटचे तीन कसोटी सामने जिंकले आहेत. त्यापैकी दोन इंग्लंड तर एक दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आहेत. जर संघाने हा कसोटी सामना जिंकला तर महिला क्रिकेटमध्ये सलग 4 कसोटी सामने जिंकणारा हा पहिला संघ ठरेल. भारतीय संघाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने तीन वेळा सलग कसोटी सामना जिंकण्याची कमाल केली आहे. दुसरीकडे, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला तीन वनडे आणि टी-20 सामनेदेखील खेळायचे आहेत. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये वनडे विश्वचषक होणार आहे त्यामुळे ही मालिका खेळाडूंसाठी महत्त्वाची असेल.